पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/451

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

देत एक नवा नाटकीय फॉर्म घेऊन येते. म्हणून अभिनयाचा कस पाहणारी हे एकपात्री नाटक इंग्रजीत शबाना आझमी, कानडीमध्ये अरुंधती नाग तर मराठीत रीमानं सादर केलं, हे या नाटकाची गुणवत्ता सिद्ध करायला पुरेसं आहे.
 ‘ब्रोकन इमेजेस' हे नाटक गिरीश कर्नाडांनी नेहमीच्या प्रथेविरुद्ध जात प्रथम कानडीमध्ये न लिहिता इंग्रजीत लिहिलं व त्याचा विषय पण भारतीय साहित्य- संस्कृतीमधलं भाषिक राजकारण. देशी भाषेतलं व्हर्नेक्युलर साहित्य व भारतीयांनी इंग्रजीत लिहिलेलं साहित्य हा न संपणारा वाद आहे, कारण इंग्रजीत दुय्यम लिहूनही ‘लिटररी जाएंट' म्हणून मिरवता येतं; कारण आपली भारतीय मानसिकता. आज चेतन भगत व अमित त्रिपाठीसारखे लेखक त्यांचे साहित्य दुय्यम दर्जाचे असूनही लाखातला खप व कोटीतले मानधनामुळे साहित्यिक प्रस्थ झालेले आपण पाहात आहोत. या पाश्र्वभूमीवर ज्यांची सर्व नाटके इंग्रजी व अनेक भारतीय भाषामधून भाषांतरित झालेली व रंगमंचावर गाजली, ते कार्नाड हा विषय घेतात तेव्हा त्यांच्यावर 'कोल्ह्याला द्राक्ष आंबट' म्हणून दुर्लक्षित करता येत नाही. या नाटकाची नायिका जेव्हा कन्नडमध्ये लिहीत असते तेव्हा फारशी प्रकाशात नसते, पण जेव्हा मृत बहिणीची इंग्रजी कादंबरी स्वत:च्या नावाने छापते, तेव्हा ती साहित्यिक लिजंड बनते व एके दिवशी तिचं टी.व्ही. मधलं प्रतिबिंब, जे तिचं मन आहे - अल्टर इगो आहे - बोलू लागतं तेव्हा एक क्षुल्लक बौद्धिक चर्चा नाही, तर मंजुळा, तिची मृत बहीण व तिला सोडून गेलेला नवरा या तिघांच्या नात्यांची गुंतागुंतही प्रकट होते व एक रसरशीत नाट्यानुभव व तोही नव्या अभिनव तंत्ररचनेतून मिळतो, आणि पुन्हा एकदा कार्नाड रसिकांना अचंबित करतात.
 ‘फ्लॉवर्स' हा त्यांचा २००४ मधलाच दुसरा मोनोलॉग आहे, त्याचं तंत्र नवं असलं तरी पुन्हा एक मिथकाचा त्यांनी आधार घेतला आहे. पण इथं स्त्रीऐवजी एक पुरुष केंद्रस्थानी आहे,हे वेगळेपण आहे. एक विवाहित पुजारी दिवसा शिवलिंगाची मनोभावे पूजा करीत असतो, तर रात्री गणिकेवर तीच फुले माळून तिला शृंगारित करून तिच्याशी संग करीत असतो. विशुद्ध देवभक्ती व तेवढीच उत्कट रतीक्रीडेची आसक्ती त्याच्या ठायी असते. एकदा प्रसादाच्या पेढ्यात केस निघतो, तेव्हा जाब विचारला असता पुजारी हा देवाचा शिवलिंगाचा केस आहे असं सांगतो. ते सिद्ध करण्याची पाळी येते, तेव्हा तो उत्कटतेने देवाची आराधना करतो व चमत्कार होत शिवलिंगावर लांब रेशमी केस येतात, जेव्हा तो केस काढायला जातो, शिवलिंगातून रक्त वाहू लागतं. आपण देवाला जखमी केलं व घोर पाप केलं या जाणिवेनं पुजारी स्वत:चं मस्तक देहापासून अलग करीत शिवलिंगाला अर्पण करतो. या नाटकातून भक्ती व प्रेमाचं द्वंद्व एकपात्री कथनातून उत्कटतेनं कार्नाडांनी साकार केलं आहे.

 सधा के अरोरांनी या दोन मोनोलॉगबद्दल मार्मिक निरीक्षण नोंदवत असं म्हटलं

४५० ■ लक्षदीप