पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/450

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Passage) मध्ये ‘तलेदंडा'चे महत्त्व अधोरेखित करताना म्हणतात की, या नाटकात समकालीन समाज व साहित्याचे अनुस्यूत असलेले नाते कार्नाडांनी नेमकेपणाने शोधले आहे. आधुनिकता व परंपरा, रूढीवाद व सुधारकीपणा, अध्यात्मिक व ऐहिक तसेच ध्येयवाद व व्यवहारवाद यातले द्वंद्व प्रकट करताना हिंदूधर्मातील जातिवादाचे समग्र रूप परिणामकारकतेने त्यांनी व्यक्त केले आहेत.
 ‘तुघलक’, ‘टिपू सुलतानाची स्वप्ने’ आणि ‘तलेदंडा' या ऐतिहासिक नाटत्रयीतून इतिहासकालीन चरित्रनाटकाच्या माध्यामातून संघर्षपूर्ण नाट्यानुभव जिवंत करताना कार्नाडांनी त्याद्वारे भारताचे प्रश्न व समस्या मांडल्या आहेत. मूल्यांची घसरण व आदर्शवादी स्वप्नांची विफलता (तुघलक), वसाहतवादाचे बळी (टिपू) आणि जाती- धर्माचा उद्धार भारताच्या कल्पनेला (The ldea of India) कसा सुरुंग लावत आहे. (तलेदंडा) हे या नाटकातून कलात्मक तटस्थतेनं प्रेक्षक व वाचकांना विचार करण्यास प्रवृत्त करतं. त्यामुळे त्यांची ऐतिहासिक नाटके आधुनिक भारतीय रंगभूमीवर वेगळेपणा व समकालीन प्रस्तुततेमुळे महत्त्वाची मानदंडे ठरतात!

एकविसाव्या शतकातील आजच्या काळाची नाटके :
‘ब्रोकन इमेजेस', 'फ्लॉवर्स' 'वेडिंग अल्बम' आणि 'उणे पुरे शहर एक'

 १९६१ साली लिहिलेल्या 'ययाती'पासून 'बळी' पर्यंतच्या नऊ नाटकातून २००३ पर्यंत गिरीश कर्नाडांनी पुराण, मिथके व इतिहासाचा आधार घेत नाट्यरचना केली. त्यामुळे आपल्या मुळांशी जात त्यांनी एतद्देशीय रंगभूमीला नवे आयाम दिल. पण त्याचबरोबर हाही प्रश्न उपस्थित होत होता की, कर्नाड हे आजच्या वर्तमानाच्या प्रश्नांना का भिडत नाहीत? कदाचित त्यांनाही हा प्रश्न मनोमन पडत असणार. ही खरा कलावंत - तोच जो सातत्याने विकसित होत जातो व प्रेक्षक / वाचकाना नव काही देत जातो. पुराणकथा, मिथके व इतिहास अशा तीन ‘जेनर' ची नाटक लिहिल्यानंतर २००४ साली दोन एकपात्री नाटके-मोनोलॉग लिहून कर्नाडांच्या नाट्यलेखनाचा नवा अध्याय सुरू झाला. प्रथमच त्यांनी इंग्रजीतून ‘ब्रोकन इमेजस व ‘फ्लॉवर्स' हे दोन मोनोलॉग्ज लिहिले व त्यानंतर ‘वेडिंग आल्बम' व उणे पुरे शहर एक' ही नाटके आली. या चार नाटकात त्यांनी नाट्यलेखनाचे नवे प्रयोग तर केलच पण नव्या आधुनिक प्रश्नांना ते सामोरे गेले व आपल्यातली नाट्यप्रतिभा अजूनही अक्षुण्ण आहे व प्रेक्षकांना अकल्पित सुखद धक्के देऊ शकते हे त्यांनी दाखवून दिले.

 २००४ साली रंगभूमीवर आलेलं व आजही गाजत असलेलं ‘ब्रोकन इमेजस हा मोनोलॉग आहे, पण त्यात नव्या तंत्राचा नाट्यपूर्णतेसाठी केलेला वापर प्रयोगाला एक नवी झळाळी देऊन जातो. एक स्त्री टीव्हीवरील आपल्या प्रतिमेशी बोलत राहात, अशी ही क्लृप्ती, पण ती केवळ टूम म्हणून येत नाही, तर नाट्यविषयाला पूर्ण न्याय

लक्षदीप ■ ४४९