पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/449

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ‘तलेदंडा'चं कथानक सांगायचं झालं तर बाराव्या शतकातील बसवण्णा या समाजसुधारक संतांनी वर्णाश्रम व्यवस्था मानणाच्या सनातन धर्माविरुद्ध बंड पुकारीत लिंगायत धर्माची स्थापना केली. जातीनिर्मूलन, लिंगसमानता, मूर्ती-पूजेचा त्याग,ब्राह्मणी व्यवस्थेस नकार व संस्कृतऐवजी मातृ-बोली भाषा म्हणून कन्नडचा स्वीकार हा या धर्माचा गाभा होता. त्याला ब्राह्मण्यानं व रूढी-परंपरा मानणाच्या उच्चवर्णीयांनी विरोध केला नाही तर नवलं होतं! हा विरोध जेव्हा कलावती या ब्राह्मण कन्येचा चर्मकार समाजातील शीलवंताशी लग्न लावून देण्यात आलं तेव्हा तीव्र व हिंसक झाला व ही समाजसुधारणेची चळवळ रक्तपात व क्रौर्य-हिंसेमुळे थंडावली.
 या नाटकातून गिरीश कार्नाडांनी कौशल्याने वर्णाश्रम धर्मात तथाकथित हीन जातीच्या माणसांना सामाजिक व्यवहारात उच्चवर्णीयांचं वर्चस्व मान्य केल्याखेरीज सरळपणे जगता येत नाही; राजा बिजालाची पण हीच व्यथा आहे की तो राज्यकर्ता असूनही ब्राह्मणी व्यवस्था त्याला हीन समजते- त्याची व्यथा या संवादातून अंगावर येते. “दहा पिढ्यांपासून राजघराण्याशी वैवाहिक संबंध जोडला, ब्राह्मणांना लक्षावधी गायींची लाच दिली, जेणेकरून आम्हांस क्षत्रिय मानावं. पण आज माझी जात काय? तत्काळ उत्तर आले - न्हावी. जात ही माणसाच्या कातडीप्रमाणे केवळ शरीराला नव्हे तर अस्तित्वाला चिकटलेली असते. कातडी वरपासून खालीपर्यंत सोलून काढली तरी नवी कातडी आल्यावर पुन्हा तीच जात असते - न्हावी." हा प्रश्न घटनेने जाती निर्मूलन करूनही किती जिवंत आहे, नव्हे, पुन्हा तो किती उग्र, किती विकृत होत आहे, हे सांगणे नलगे. तो या नाटकात तीव्रतेनं मांडला आहे.
 बसवण्णांच्या लिंगायत धर्मात सर्व हीन जातीचे जसे सामील झाले तसे उच्चवर्णीयही. या भक्तांना शरण म्हटलं जाऊ लागलं. शीलवती - गुणवंतांच्या विवाहानं वर्णाश्रम व्यवस्थेला धक्का बसल्याचा धोका लक्षात आल्यामुळे तीव्र रक्तरंजित विरोध होत ही चळवळ दडपण्यात वर्णवादी व्यवस्था यशस्वी झाली. कारण समाजसुधारणेची बसवण्णांची चळवळ अजून पुरती रुजली नव्हती. ब्राह्मण - चर्मकार विवाहाबाबत तीव्र विरोधाची शक्यता लक्षात घेऊन साशंकतेनं बसवण्णा म्हणाले होते, “आतापर्यंत वैचारिक पातळीवर सुधारवाद होता. तो आता कृतीत येतोय. तो वर्णाश्रम धर्माला मोठा धक्का आहे. व या धर्माच्या असहिष्णु पाईकांना गेल्या दोन हजार वर्षात असे आव्हान दिले गेले नाही, त्यामुळे विरोधाचे किती जालीम जहर बाहेर येईल, किती विद्वेषाची आग भडकेल, हे सांगायची गरज नाही. पुढे असेही म्हणतात, “या सुधाराबाबत कितीतरी पुढे जायचे आहे. या विवाहामुळे होणा-या क्रांतीला आपण पुरेसे तयार नाही आहोत, आपण पुरेसे काम अद्याप केलेले नाही.”

 वाय. सोमलता (Girish Karnad's Tale Danda : Painful Rite of

४४८ ■ लक्षदीप