पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/438

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विवाहबाह्य संबंधाचा धिक्कार करीत तिला छळतात. तर नितीलाईचं प्रेम असूनही अर्वसूशी ती आदिवासी असल्यामुळे आंतरजातीय विवाह निषिद्ध मानल्यामुळे होऊ शकत नाही. या नाटकात कार्नाडांनी प्रेमाचा त्रिकोण रंगवताना स्त्री तिच्या शरीरसुखासाठी प्रसंगी नैतिकतेची चौकट मोडते, हे धीटपणे, पण स्त्री पात्राला पूर्ण न्याय व सहानुभूती देत दाखवलं आहे. विशाखा धीटपणे तिच्या यवाक्रीशी असलेल्या विवाहबाह्य संबंधाची कबुली देत त्यासाठी कोणतीही शिक्षा भोगायची तयारी दाखवते. या स्त्री चित्रणाद्वारे कार्नाड आधुनिक स्त्रीचे विवाहासंदर्भातले प्रश्न नाट्यपूर्ण प्रसंगातून मांडतात. त्यामुळे पुराणकथेवरील नाटकही आधुनिक मनाला पटतं!
 पुराणकथातून बीज घेऊन गिरीश कार्नाडांनी ययाती व अग्नीवर्षातून जो आदिम मानवी भावभावनांचा खेळ रंगवला आहे व त्यात प्रेम, वासना, अहंकार, सूड, अत्याचार व खून या सर्व स्खलनशील मानवी मनाचे विश्व ज्या ताकदीने उभे केले आहे, त्यामुळे ही नाटके मानवी जीवनाची विविध रंगानं रंगलेली प्रतीकं म्हणून येतात आणि ती वाचक - प्रेक्षकांच्या मनावर गारुड करतात.

तीन
मिथकाद्वारे मानवी मनाचं समग्र दर्शन
‘हयवदन', 'नागमंडळ' व 'बळी' नाट्यत्रयी

 कदाचित गिरीश कार्नाडांचे संस्कारक्षम वालपण शिरशीसारख्या छोट्या कर्नाटकामधील गावी गेलं असल्यामुळे त्यांच्यावर यक्षगान व एकूणच कानडा पारंपरिक एतद्देशीय नाट्य-गीत-संगीत परंपरेचा अमिट प्रभाव आहे. त्यांच्यातल्या नाटककाराला हे देशी नाट्यकलेचे फॉर्म जे नाट्य उभे करायचे आहे त्यासाठी प्रभावी वाटत असल्यामुळे त्यांनी नाट्यलेखनात त्याचा जाणीवपूर्वक डोळस वापर कला आहे. पुन्हा भारतीय परंपरेत रुजलेली मिथकंही नाटकासाठी वेधक नाट्यपूर्ण असल्याचे कर्नाडमधील कलावंत हेरतो. मिथके ही एका अर्थाने मानवी जीवन व प्रसंगांची सर्व अंगे म्हणजे प्रेम, युद्ध, वासना, द्वेष, मत्सर, भीती, विश्वासघात, सूड, क्रोर्य, करुणा आणि क्षमा अशा सर्व मानवी जीवनाशी निगडित भावभावनांचे प्रकटीकरण करणारा असतात. कार्नाडांसारख्या प्रतिभावंत नाटककारास त्याचे हे सामर्थ्य लक्षात आले नसेल तर नवल ते कसले? पुन्हा त्याची मोडमोड करीत पुनर्रचना करण्याचे व त्यात प्रसंगी भर घालण्याचे मुक्त स्वातंत्र्य असतेच. मिथके म्हणजे अद्भुतता, रामाच, रोमहर्षकतेच्या अवगुंठनातून प्रकट होणारे मानवी जीवनाचे सत्य दर्शनच असत. त्यामुळे कार्नाडांनी मिथकांचा आधार घेत ‘हयवदन’, ‘नागमंडळ' व 'बळी या तीन भारतीय रंगभूमीचे वैभवशाली मानदंड ठरलेल्या नाटकांची रचना केली.

 ‘हयवदन' हे कर्नाडांचे १९७० साली लिहिलेले क्रमाने तिसरे नाटक, जे त्यांच्या शैलीचे सर्वाधिक प्रतिनिधिक स्वरूपाचे मानले जाते. यामध्ये मिथकातून

लक्षदीप ■ ४३७