पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/439

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उचललेले अद्भुत पण मानवी मनाची पूर्णत्वाची ओढ प्रखरतेने दर्शवणारे कथाबीज, त्यातील अनुस्यूत अद्भुतरम्यता, प्रातिनिधिक पात्रे, लोकरंगमंचाची मुखवटे, पडदे, बाहुल्या; कथेमधील कथा आणि काली, गणेश, रुद्र आदी देवतांच्या प्रतिमांचा जे नाटकातून सांगावयाचे आहे त्यासाठी कल्पकतेने वापर कार्नाडांनी केला आहे. ‘हयवदन चं बीज त्यांनी सोमदेवाच्या ‘बृहकथा सरित्सागरातून घेतलं आहे, तर देवदत्त व कपिलचं प्रकरण वेताळ पंचविशीतून उचललं आहे. त्यांची मनोज्ञ व रंजक गुंफण करताना त्यांनी थॉमस मान यांच्या Transposed heads या कादंबरीचा, जी संस्कृत कथानकावरून बेतलेली आहे त्यातूनही प्रेरणा घेतली आहे. पण यातून जे नाटक सिद्ध झालं आहे ते केवळ अपूर्व व प्रभावी रंगमंचीय अविष्कार म्हणलं पाहिजे. घोड्याचं मुख असलेल्या माणसाची स्व-ओळखीसाठी धडपड करताना त्याचा पूर्ण घोडा होणं, हा कार्नाडांच्या प्रतिभेचा नव अविष्कार आहे. माणसाला स्वत:च्या अपूर्णतेची जाणीव खिन्न करीत असते. जेव्हा ती प्रखर असते, तेव्हा पूर्णत्वाचा शोध सुरू होतो. ‘हयवदन' मध्ये तो गिरीश कार्नाडांनी गुंतागुंतीच्या नातेसंबंधातून प्रकट केला आहे
 ही कथा आहे. पद्मिनी या कणखर स्त्रीची व देवदत्त आणि कपिल या दोन मित्रांची तसेच तिघांच्या परस्पर संबंधांची. देवदत्त हा बुद्धिमान ब्राह्मण तर कपिल हा पिळदार शरीराचा लोहार, कार्नाडांनी देवदत्त हे ग्रीक प्रतीक अपोलोचं प्रतिरूप कल्पिलं आहे, जे बुद्धी, कला, संगीत, संयम व प्रमाणबद्धतेचं प्रतीक आहे. कपिल हा सहज आदिम प्रवृत्तीचा, अंत:प्रेरणेवर जगणारा, प्रबळ वासना असणारा. त्याला डायनोसिसचं प्रतिरूप केलं आहे. पद्मिनीचं जरी देवदत्तशी लग्न झालं असलं व त्याच्या बुद्धी व कलेची ओढ असली तरी कपिलचं पिळदार शरीरही तिला मोह पाडीत असतं, त्यातून कालिमातेपुढे हे दोन मित्र जेव्हा डोके छाटून अर्पण करतात व तिच्या आशीर्वादानं दोघांना जिवंत करताना ती डोक्याची अदलाबदल करते व कपिलचं शरीर पण देवदत्तचं डोकं असलेला पती म्हणून स्वीकारते. म्हणजे एकाचवेळी बौद्धिक कलात्मक सुख देवदत्तच्या बुद्धी व मनाद्वारे तर शरीरसुख कपिलच्या पिळदार शरीरामुळे मिळवायचा तिचा प्रयत्न असते, त्यातून तिची पूर्ण पुरुषाची ओढ पूर्णत्वास जाते. पण बुद्धीचा प्रभाव पडून शरीर जेव्हा कोमल होतं, तेव्हा कपिलचं शरीर देवदत्तचं होऊन जातं...आणि एक अपूर्व नाटकीय पेच दाखवत मानवी मनाची पूर्णत्वाची ओढ दाखवताना ती कशी असाध्य आहे हे कलात्मकतेनं प्रगट होते.

 दोन डोक्यांची अदलाबदल दाखवताना गिरीश कार्नाड मुखवट्यांचा वापर करतात, ही देशी नाट्य परंपरेची देणगी आहे. ती नाट्यपूर्ण प्रसंग सहजतेने रंगमंचावर साकार करते. ही मुखवट्याची परंपरा यक्षगानमध्ये प्रकर्षाने असते. या नाटकात त्यांनी दोन बाहुल्यांना प्रसंगाची नाट्यमयता प्रभावी करण्यासाठी वापरले आहे. त्यांचे संभाषण पात्रांना ऐकू येत नाही, तर केवळ नाटक पाहाणाच्या प्रेक्षकांना ऐकू येते, हीही

४३८ ■ लक्षदीप