पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/437

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मुलगी व तिची प्रेमी व रायभ्याचा धाकटा मुलगा अर्वसू यांच्या नि:स्वार्थ प्रेमाचा. कथानकाचा गाभा हो पावसासाठी सात वर्षे यज्ञ मांडण्याचा खटाटोप व दोन ऋषी कुटुंबाच्या संघर्षाचा आहे. या यज्ञाचा मुख्य पुजारी हा पर्वसू हा रायभ्याचा मोठा मुलगा आहे. खरं तर रूढी परंपरेप्रमाणे त्याच्या वडिलांनाच हा मान मिळायला हवा. कारण भारतात वृद्धत्वे हे शहाणपणाशी जोडलं गेलं आहे. पण राजा त्याच्याऐवजी सात वर्षाचा दीर्घ काळ लक्षात घेऊन पर्वसूला नेमतो; पण त्यांचा चुलत भाऊ अवाक्री, जो भारद्वाजांचा मुलगा आहे तो, अपमानित होतो. कारण त्याने दहा वर्षे दिव्य ज्ञानासाठी तप केलं आहे. पुन्हा त्याचा पर्वसूवर वैयक्तिक राग आहे. कारण त्याची प्रेमिका विशाखा, जिला त्यानं दिव्यज्ञान मिळवण्याच्या हेतूने रानात तप करण्यासाठी जताना सोडलं होतं, ती आता पर्वसूची पत्नी झाली आहे. तो तिच्या पुन्हा जीवनात येतो व पतीविना एकट्या विशाखाला तो सेड्यूस करतो. तिचा सासरा रायभ्या तिची निर्भर्सना करतो. पर्वसू एका रात्रीसाठी घरी आला असता त्याला हे समजते. तसेच वडिलांनी यज्ञात विघ्न यावं म्हणून ब्रह्मराक्षस निर्माण करून यवाक्रीला मारल्याचं समजल्यामुळे व पत्नीला त्रास दिल्यामुळे त्यांचा खून करतो, पण त्याचा धाकट्या भावावर अर्वसूवर आळ घालतो. इकडे अर्वसूचं आदिवासी कन्या नितीलाईंशी लग्न होऊ शकत नाही, तिला नाईलाजानं आपल्या जातीत वडिलांच्या इच्छेप्रमाणे लग्न करावं लागतं. तिचा नव-याला संशय येतो व तो तिचा बळी घेतो. अर्वसूसाठी ही तिहेरी हानी आहे. एकतर प्रेमिका नितीलाईचा खून, दुसरा वडिलांचा तर तिसरा भावाच्या विश्वासघाताचा या गुंतागुंतीच्या कथानकातून कर्नाड आजच्या काळाचंच चित्र रेखाटतात, जेथे प्रेमापेक्षा स्वत:ची महत्त्वाकांक्षा महत्त्वाची मानणं, जेथे मानवी नाती जपण्याऐवजी आपली सत्ता, मोठेपणाला अग्रक्रम देणे ही आधुनिक कालखंडाची झालेली घसरण ते समर्थपणे या मिथकाच्या माध्यमातून चितारतात.

 गिरीश कर्नाडांच्या या व एकूणच नाट्यसंसारात स्त्री पात्रांत भाव - भावनाचं ठसठशीत चित्रण येतं. नायिका जरी पुराणकाळ, मिथक वा इतिहासकालीन असली तरी तिच्याद्वारे कार्नाड मोठ्या ताकदीनं आजच्या आधुनिक स्त्रीचे प्रश्न उपस्थित करतात, ‘अग्नीवर्षा’ मध्ये विशाखा व नितीलाई ही दोन्ही पात्रं त्या दृष्टीने पाहाण्याजोगी आहेत. या दोघी समजूतदार व सुजाण आहेत; पण त्यांचे नवरे त्यांना समजून घेऊ शकत नाहीत, ही पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेत स्त्रीची शोकांतिका तेव्हाही होती व आजही आहे. आज कितीही प्रेमविवाहाचा गवगवा असला तरी आजही भारतात बहुसंख्य विवाह दाखवून - घडवून आणलेले विवाह, अॅरेंज्ड मॅरेजेस असतात. त्याचे दुष्परिणाम प्रामुख्याने स्त्रीला भोगावे लागतात. विशाखाचं यवाक्रीवर प्रेम, पण तो गेल्यावर नाईलाजानं वडिलांनी निवडलेल्या पर्वसूच्या गळ्यात तिला माळ टाकावी लागते. दोघेही तिच्या मनाचा व शरीरभुकेचा जराही विचार करीत नाहीत. उलट तिच्या

४३६ ■ लक्षदीप