पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/424

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लिंग असमानता आहे. प्रो. सेन हे पहिल्या विचार प्रवाहाचे खंदे समर्थक आहेत. त्यांच्या मते स्त्रियांना जेव्हा अर्थवाही रोजगार उपलब्ध होतो, त्यांचे समाजातील स्थान उंचावते व त्या प्रमाणात त्यांच्या वाट्यास लिंग असमानता कमी प्रमाणात येते. तसेच स्त्री साक्षरता, शिक्षण आणि त्यांचे सामाजिक स्थान उंचावणाच्या इतर बाबींमुळे कुटुंबात स्त्रीला व तिच्या विचारांना महत्त्व प्राप्त होते. याचे नमुनेदार उदाहरण आहे. केरळ राज्य, जे देशातील इतर राज्यांचा तुलनेत मृत्यूदराच्या बाबत अधिक लिंग समान आहे. तेथे जन्माच्या वेळी मुलींचे जगण्याचे प्रमाण ७६ टक्के आहे, तर पुरुषांचे ७० टक्के तेथे स्त्री - पुरुष लोकसंख्येचे प्रमाण १.०६ आहे, (२००१ च्या जनगणनेनुसार) जे युरोप व उत्तर अमेरिकेच्या १.०५ च्या तुलनेमध्ये अधिक आहे. याची कारणे देताना सेन तेथील स्त्रीच्या शंभर टक्के साक्षरतेकडे लक्ष वेधतात. तसेच तेथील जोडप्यांच्या जननक्षमतेत झपाट्याने होत असलेली घसरणही लक्षणीय आहे, जी चीनपेक्षाही (जेथे कठोर पद्धतीने कुटुंब नियोजन राबवले जाते) अधिक आहे. ती केवळ १.०७ ते १.०८ आहे, जी ब्रिटन व फ्रान्स एवढीच आहे व अमेरिकेपेक्षा अधिक आहे. अर्थात केरळ मॉडेल हे जसेच्या तसे अनुकरणीय नाही, हेही नमूद करायला सेन विसरत नाहीत. केरळची ही प्रगती काही खास बाबीमुळे अधिक आहे. तेथे बहुसंख्या असलेल्या नायर जमातीमध्ये स्त्रीसत्ताक कुटुब व्यवस्था असल्यामुळे जमिनीची मालकी स्त्रियांकडे मोठ्या प्रमाणात आहे. केरळच्या लोकसंख्येत एक पंचमांश ख्रिश्चन आहेत, जे चवथ्या शतकापासून आलेले आहेत. त्यांच्यामुळे सामाजिक मोकळेपणा व जगाशी सर्वाधिक संपर्क केरळचा आलेला आहे. तसेच तेथील डाव्या चळवळीमुळे समानतेचा विचार दृढपणे रुजला गेला आहे. या कारणांमुळे केरळ हे सार्वत्रिक अनुकरणीय मॉडेल होऊ शकत नाही. तरी लिंग समानतेसाठी किमानपक्षी शंभर टक्के साक्षरता आणि स्त्रियांचे नोकच्यातील वाढते प्रमाण या केरळच्या दोन बाबी देशातील सर्व राज्यांनी स्वीकारल्या पाहिजेत, यावर दुमत असणार नाही. हरवलेल्या स्त्रिया या सिद्धान्ताच्या आधारे प्रो. सेन जन्म व मृत्यू दरातील असमानता ह्याच लिंग असमानतेच्या एकमेव पैलूवर केवळ लक्ष केंद्रित करीत नाहीत, तर त्यांच्या विभिन्न पैलूंचाही ताकदीने व प्रज्ञेने शोध घेतात. त्यांच्या मते या संदर्भात खालील चार बाबी महत्त्वाच्या आहेत.
१. मुलींचे कुपोषण :

 जन्माच्या वेळी मुले व मुली सारख्याच प्रमाणात वाढ झालेली असतात, कारण निसर्ग हा याबाबत लिंगनिरपेक्ष आहे. पण जन्मानंतर मुला-मुलींना मिळणा-या असमान सामाजिक वागणुकीमुळे मुलांच्या तुलनेत मुलींना कमी व निकृष्ट आहार मिळत जाती व त्यामुळे त्या अशक्त व कुपोषित होतात. प्रो. सेन यांनी १९८३ मध्ये स्वत: आपल्या सहका-यांसह केस स्टडी म्हणून दोन गावात सर्वेक्षण करून पाच वर्षाखालील

लक्षदीप ■ ४२३