पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/425

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रत्येक मुलांचं वजन करून नोंदवलं होतं. त्यांना हे दिसून आलं की, जन्माच्या वेळी वजनात फारसा फरक नसला तरी पाच वर्षे होईपर्यंत मुला व मुलीच्या वजनात, जे। आरोग्याचे व पोषणाचे एक प्रमुख लक्षण आहे, लक्षणीय फरक पडत जातो. आणि पुढेही वाढत्या वयात व्यस्त प्रमाणात स्त्री पुरुषात हा फरक दिसून येतो. ज्याप्रमाणे कमी व निकृष्ट दर्जाचा मुलींना मिळणारा आहार हा लिंगभेदाचा एक प्रकार आहे, तसाच प्रकार वैद्यकीय सुविधांबाबतही, मुलीकडे कमी वा अजिबात लक्ष न देणे याद्वारेही, दिसून येतो, प्रो. सेन यांनी मुंबईतील दोन मोठ्या सार्वजनिक दवाखान्यात येणा-या रुग्णांचा अभ्यास केला असता त्यांना दिसून आलं की, तेथे येणा-या स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक प्रमाणात आजारी होत्या. थोडक्यात मुलींचे व स्त्रियांचे होणारे पोषण हा लिंग असमानतेचा चिंताजनक पैलू आहे.
२. मातेचे कुपोषण
 दक्षिण आशियामध्ये मातेच्या कुपोषणाची समस्या दिसून येते, बॉडी मास इंडेक्स आणि अॅनिमिक अवस्था लिंग असमानता दर्शवितात.
३. अशक्त मुलांचा जन्म
 दक्षिण आशियामध्ये २१ टक्के बालके जन्माच्या वेळी वैद्यकीय परिभाषेत कमी वजनाची व अशक्त (Clinically underweight) जन्मास येतात. मातेच्या कुपोषणाशी याचा शास्त्रीय संबंध लावता येतो. सबसहारा आफ्रिकन देशात अशक्त मुलांच्या जन्माची टक्केवारी २० ते ४० आहे, तर दक्षिण आशियाई देशात ती त्याच्या दुप्पट म्हणजे ४० ते ६० टक्के एवढी आहे. थोडक्यात प्रतिकूल परिस्थितीत जन्म व पुढेही तसंच जगणं, हे या मुलांचे अटळ असं (अर्थात मानवनिर्मित) वास्तव म्हटलं पाहिजे.
४. हृदयरोगांचे वाढते प्रमाण

 तिस-या जगामध्ये सर्वात जास्त हृदयरोगांचे प्रमाण दक्षिण अशियाई देशात दिसून येते. वरील तिन्ही कारणे थोड्याफार फरकाने भारत व चीनमध्ये समान असूनही भारतात हृदयरोगांचे प्रमाण जादा आहे. ब्रिटिश डॉक्टर प्रो. डी. जे. पी. बेकर यांनी त्यांच्या संशोधनातून असं दाखवून दिलं आहे की, बालकांचे जन्मजात कमी असणारे वजन आणि हृदयरोगांचा जवळचा संबंध आहे. या संशोधनाचा आधार घेत प्रो. सेन असे प्रतिपादन करतात की हृदयरोग व इतर विकार यांचा मुलीचे व मातेचे कुपोषण व बालकांचे जन्मजात कमी वजन असणे या तीन घटकांची सांगड घालता येते.मुलीचा अपुरा आहार व आरोग्यसुविधांमुळे होणारे कुपोषण, पुढे जाऊन ती जेव्हा माता बनते, त्या मातेच्या कुपोषणात परावर्तित होते. त्यामुळे गर्भाचे अपुरे पोषण व बालकाच्या जन्माच्या वेळी वैद्यकीय कसोट्यांप्रमाणे धोकादायक कमी वजन या बाबी उद्भवतात. ही बालके जेव्हा मोठी होतात, तेव्हा हृदयरोगासोबत हायपर टेन्शन,मधुमेह ह्या विकारांना अधिक प्रमाणात बळी पडतात. लिंग असमानतेमधून स्त्रीविरुद्ध

४२४ ■ लक्षदीप