पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/397

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वाढत जाते. मूठभर श्रीमंत व मध्यमवर्गीय मुस्लीम समाज आधुनिक शिक्षण घेतो व इतर हिंदू-शीख समाजाप्रमाणे जीवन जगतो. पण तरीही त्यांची धर्माशी जोडलेली नाळ फारशी कमी होत नाही. त्याचं कारण इस्लाम हा केवळ पारलौकिक जीवनाची आस दाखवणारा धर्म नाही, तर तो त्या बरोबरच ऐहिक धर्म आहे. जीवनाची सर्व अंग व्यापून टाकणारा आहे. त्यामुळे या समाजात अस्तिकता जवळपास पूर्ण आहे. इथं ‘काफीर’ शिक्का बसला की, संपलं. त्याला मग इस्लामी समाजजीवनात स्थान उरत नाही. महाराष्ट्रातल्या हमीद दलवाई व मुमताज रहिमतपुरे यांना त्यांच्या समाजानं कसं बहिष्कृत केलं होतं, हे सांगायला नको.
 शिक्षणाच्या बाबतीत मुस्लिमांची अवस्था चिंताजनक आहे, हे मात्र पुन्हा एकदा मनावर ठसठशीतपणे बिबवलं गेलं. उर्दू - अरेबी शिक्षणामुळे व तेही परंपरागत मदरसा शिक्षणामुळे मुस्लीम युवकांसाठी आधुनिक ज्ञान-विज्ञानसंपन्न जीवनाची व नोकरी उद्योगांची दारं बंद होतात; कारण भारतात उत्तर प्रदेशामध्येच केवळ उर्दू दुसरी राज्यभाषा आहे. इतरत्र त्या त्या प्रदेशाच्या भाषेतच राज्य-कारभार चालतो. त्यामुळे नोक-यांत मुस्लिमांचं प्रमाण कमी आहे. मी १९९४-९५ मध्ये परभणी जिल्ह्यात प्रौढ साक्षरता अभियानाचा मुख्य समन्वयक होतो. परभणी शहरात अशिक्षित मुस्लिमांसाठी आम्ही प्रौढ साक्षरता वर्ग सुरू केले होते. ते मराठीतून व्हावेत ही भूमिका मी मांडली होती, पण तेथील एक माजी नगराध्यक्ष व इंजिनिअर म्हणून सेवानिवृत्त झालेल्या विद्यमान नगरसेवकांनी माझा प्रस्ताव हाणून पाडून उर्दूमधून साक्षरतेचे वर्ग चालवावेत असा आग्रह धरला. त्यामुळे नाईलाजाने उर्दूमध्येच वर्ग सुरू झाले. त्या वेळी मला प्रश्न पडला होता, त्यांना कचेरीतल्या कामासाठी मराठीत अर्ज कसा करता येईल? मराठीतले रेशनकार्ड, रोजगार हमी कामाची हजेरी व पगार पट कसे वाचता येतील? मग अक्षर ओळख होऊनही (अर्थात उर्दूची) त्यांची कार्यात्मक साक्षरता शून्यच राहणार. माझ्या या प्रश्नाचं त्यांनी उत्तर दिलं नाही. त्यांची तशी इच्छाही नव्हती.
 मात्र दक्षिण भारतात मुस्लीम तेथील स्थानिक भाषेत शिक्षण घेतात व लेखनही करतात. खास करून केरळचे उदाहरण आदर्श म्हणून देता येईल. भारतातला एक मोठा कादंबरीकार बशिर यांनी ‘कायर' (दोरी) ही कादंबरी (ही एक महानतम कलाकृती आहे, असं डॉ. चंद्रकांत बांदिवडेकरांचं म्हणणं आहे.) मल्याळी भाषेत लिहिलेली आहे, केरळमध्ये मुस्लिमात मल्याळी शिक्षणाचं प्रमाण लक्षणीय आहे, त्यामुळे विविध धर्मगटातली समरसता निश्चितच अधिक आहे.

 आता माझा दारुल उलुमचा फेरफटका पूर्ण झाला होता. व्यवस्थापकांनी मला त्यांच्या कार्यालयात जलपानासाठी नेलं, तिथे चहा-फराळ झाला. निवांतपणे थोड्या गप्पाटप्पा झाल्या, तेव्हा मी पुन्हा विचारलं, “माफ करना, कुछ साफ साफ पुछे, तो बुरा नहीं मानोगे? और जबाब भी दोगे?"

३९६ ■ लक्षदीप