पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/396

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

केलेला अभ्यासक्रम हा 'दरस ए निझामी' या नावाने ओळखला जातो. तोच 'दारुल उलुम'च्या अभ्यासक्रमाचा प्रमुख गाभा आहे. मला त्यांनी त्यांच्या अभ्यासक्रमाची इंग्रजी पुस्तिका दिली. त्यात प्रत्येक वर्षांचा अभ्यासक्रम दिला आहे, त्याचेही चार भाग आहेत, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व पदव्युत्तर शिक्षण, उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिलं जातं. अलीकडे हिंदी, संगणक व काही प्रमाणात इंग्रजी भाषेच्या शिक्षणावर उत्तर प्रदेशामधील विविध मदरशांनी भर द्यायला सुरुवात केली आहे.मुझफ्फरनगर जिल्ह्यात बागवली येथे असाच एक मोठा (अर्थात देवबंदपेक्षा छोटा) मदरसा आहे. तेथे एक मतदान केंद्र होतं, ते मी कामाचा भाग म्हणून पाहायला गेलो होतो. तिथं त्यांनी मला हिंदी, भूगोलाची राज्य सरकारची पाठ्यपुस्तके शिकवली जात असल्याची माहिती दिली. त्यांची छोटेखानी संगणक प्रयोगशाळाही मी पाहिली.हे आधुनिक बदल विद्याथ्र्यांसाठी स्वागतार्ह आहेत, पण ही केवळ सुरुवात आहे. त्यांना खूप मोठी मजल मारण्याची आवश्यकता आहे.
 बागवालीला तेथील मुफ्तीला मी जो प्रश्न विचारला होता, तो इथंही व्यवस्थापकांना विचारला, “आपला सारा भर धर्मशिक्षणावर आहे, त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. पण इथं शिकणारे सारेच काही मौलवी व उलेमा होत नाहीत. त्यांचे पुढे काय होणार? केवळ अरबी व उर्दू शिकून त्यांना नोक-या मिळतील का? उद्योग व व्यापारउदीमासाठी स्थानिक भाषा व इंग्रजी यायला नको का? आधुनिक भाषा व शास्त्र मुस्लीम युवक शिकले नाहीत, तर ते सर्वच क्षेत्रात मागे पडणार नाहीत का? मुस्लीम समाजाची आजची गरिबी व अशिक्षितपणा किती जास्त आहे, हे राजेंद्र सच्चर समितीने दाखवून दिलं आहे. त्यावर काय तोडगा आहे आपल्याजवळ? इथलं ‘दारुल उलुम ही केवळ हिंदुस्थानातीलच (मुस्लीम लोक भारत न म्हणता बहुतेक वेळा हिंदुस्थान किंवा इंडियाच म्हणतात.) नाही तर पूर्ण आशियातील सर्वांत मोठी मदरसा आहे. आपणच मार्ग दाखवला पाहिजे."
 माझ्या या प्रश्नाशी ते सहमत नव्हते, पण तरीही काहीसे अस्वस्थ नक्कीच झाले होते. प्रमुख अधिकारी माणसं जलशामध्ये व्यस्त होती. त्यामुळे त्यांच्याशी संवाद होणं शक्य नव्हतं आणि माझ्या सोबतची माणसं त्याबाबत उत्तर द्यायला असमर्थ होती की, अनुत्सुक होती हे कळत नव्हतं. तरीही मी त्यांना पुन्हा पुन्हा विचारलं, त्यानंतर जी माहिती मिळाली ती विचार करायला लावण्याजोगी होती.

 दरवर्षी सहा-सात हजार विद्यार्थी धर्मशिक्षण संपवून बाहेर पडतात, त्यातले हजार-बाराशे विविध मशिदींमध्ये पुढील जीवनक्रम व्यतीत करतात. बाकीचे प्रपंचाकडे वळतात. काही मोजकेच शासकीय शिक्षणक्रमात प्रवेश घेतात व नोकरी मिळवतात.बाकीचे शेतीवाडी व छोटामोठा व्यापार करतात. जे जमीनदार व शहरी वातावरणात राहणारे आहेत, त्यांची मुलं प्रामुख्याने इंग्रजी शिक्षण घेतात आणि शैक्षणिक दरी

लक्षदीप ■ ३९५