पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/394

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

परिसरात व जवळ मुस्लीम मुलांना मोफत धर्मशिक्षण मिळावं म्हणून मदरसे स्थापायला उत्तेजन दिलं गेलं आणि आज भारत-पाकिस्तानमध्ये अनेक शहरे, गावात शेकडो मदरसे आहेत व गरीब विद्यार्थ्यांना खाण्यापिण्यासह निवासी शिक्षण दिलं जातं.भारतातील सुमारे आठ-नऊशे महत्त्वाच्या मदरशांची संलग्नता ‘दारुल उलुम'ला आहे,दरवर्षी ते इथं जमतात आणि विचाराचे आदानप्रदान होऊन त्यांना शिक्षणबाबत मार्गदर्शन केलं जातं.
 आम्ही त्या देखण्या मशिदीमध्ये शिरलो. सुमारे पाच हजार लोक बसतील एवढं मोठे सभागृह होतं. ते खचाखच भरलेलं होतं. स्टेजवर मुख्य मुफ्ती म्हणजेच व्हाईस चान्सलरचं समारोपाचं मार्गदर्शनपर भाषण सुरू असल्याची माहिती मला सोबत करणा-यांनी दिली. “मैं कुछ देर सुनना चाहूंगा. मुझे ठीकसे उर्दू जबान समझती है." मी म्हणालो. उत्सुकतेनं माहिती घेण्याच्या माझ्या स्वभावाचं त्यांना कौतुक वाटत होतं.
 सुमारे वीस-पंचवीस मिनिटं मी इस्लामच्या सर्वांत मोठ्या शक्तिशाली व प्रभावी केंद्राच्या प्रमुखाचं धर्मप्रवचन ऐकत होतो. आधी त्यांनी धर्मशिक्षणाबाबत सांगितलं,मग ते जगाच्या सद्य: स्थितीकडे वळाले. त्यांचा आवाज तापत गेला आणि आपल्या प्रभावी अस्खलित भाषणात त्यांनी इस्लामचा सर्वांत मोठा शत्रू अमेरिका कसा आहे,त्यांची अमेरिकन व ईसाई संस्कृती (ख्रिश्चन धर्म) कशी पाक व नेक नाही, ती इस्लामला भ्रष्ट कशी करते, असं विवेचन ते करू लागले. त्यांनी दिलेलं स्पेनचं उदाहरण विचार करण्याजोगं होतं. “जरा सोचो, जिस देशमें कई सदी इस्लामिक राज था, आज वहाँ क्या है? पुरा ईसाई कल्चर छा गया है.” आणि मग पॅलेस्टाईन, अफगाणिस्तान, इराण व इराक प्रश्नांचा त्यांनी ऊहापोह केला.
 काही महिन्यांपूर्वी पदच्युत अध्यक्ष सद्दाम हुसेन यांना फाशी दिली गेली. ते फाशीचं दृश्य टेलिव्हिजनवर दाखवलं गेलं. त्याची आठवण झाली. मुलायमसिंग यांच्या समाजवादी पक्षाने व डाव्यांनी अमेरिकेच्या विरुद्ध उत्तरप्रदेशामध्ये काढलेले मोर्चे यांचे स्मरण झाले आणि त्याचा संदर्भ व्हाईस चान्सलरच्या प्रवचनातील अमेरिकेच्या उल्लेखानं जुळत गेला.

 हे खरं आहे की, अमेरिकेची उपभोगवादी, स्त्री-पुरुष संदर्भात मोकळी (पक्षी : स्वैर व फ्री सेक्सवाली) संस्कृती मुस्लीम धर्मसंस्कृतील निषिद्ध वाटते. पण असे वाटणारे ते एकटेच नाहीत. भारतातील धर्मप्रेमी हिंदूंनाही ती समाजविघातक वाटते.आज चोवीस घंटे केबल्सचा धुमाकूळ व अमेरिकन चॅनेल्स, रीरियल्स आणि सिनेमा,फॅशन टीव्हीद्वारे स्त्री - देहाचे प्रदर्शन करणारे शोज हे सर्व मुस्लीम समाजाला (जो मुळातच स्त्री देहाच्या प्रदर्शनाविरुद्ध आहे) हा अमेरिकन मोकळेपणा पथभ्रष्ट करणारा वाटतो. हा झाला सांस्कृतिक संदर्भ; पण अमेरिका आजच्या घडीला जगातली एकमेव

लक्षदीप ■ ३९३