पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/393

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बन गया. जिसे कुराणे - शरिफ, हादिस, सुनाह, शरिया और इस्लामके रास्ते का तरीका सिखना हैं, उनके लिए तो बस अब दुनियामें कैरोका अल अझर छोडे, तो देवबंद के सिवा और कौनसा सेंटर है?”
 त्याचं म्हणणं शब्दश: खरं होतं. दर वर्षी येथे ७००० पेक्षा जास्त विद्यार्थी इस्लाम धर्मशास्त्र शिकण्यासाठी येतात आणि आजवरच्या दीडशे वर्षात एक लाखांपेक्षा जास्त तरुणांनी आठ वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. भारत, पाकिस्तान, बांगला देशसह आशियातील अनेक शहरांच्या मशिदींमधील मौलवी व उलेमा हे मुख्यत: देवबंद प्रशिक्षित आहेत हे लक्षात घेण्यासारखं आहे.
 काही वर्षापूर्वी एका कामाच्या निमित्ताने परभणी व अकोला येथील काही मदरशांना मी भेटी दिल्या होत्या. खास करून पल्स पोलिओ मोहिमेच्या संदर्भात मुस्लिमांच्या मनात जो संशय व भीती होती, ती त्यांच्या उलेमांच्या मदतीने दूर व्हावी म्हणून. पोलिओ ड्रॉप म्हणजे कुटुंब नियेजनाचं नवं साधन असा दुष्ट प्रचार व अफवा जोर धरून होती. त्याचं तिथं निराकरण करताना मी म्हटलं होतं की, “आप तो इस्लाम के उलेमा है, पढे लिखे है, तुम्हाला ‘इज्तेहादचं तत्त्व (तर्क प्रमाणता) मी सांगायला नको." तेव्हा त्यांनी पूर्ण सहकार्य केलं आणि म्हटलं, “सही है, हम देवबंदसे सिखकर आए है. बच्चोंको स्वस्थ रखना हमारा काम हैं. ये इस्लाम के यकिनन खिलाफ नहीं.”
 देवबंदचा ‘दारुल उलुम'चा मदरसा म्हणजे चार - पाच मोठ मोठ्या जुन्या पठडींच्या इमारती व मध्ये मोठी जागा. त्यांची जीर्णावस्था भिंतींचे पोपडे उडाल्यामुळे अधिकच जाणवत होती. मात्र त्याच्या काटकोनात एक भव्य, अक्षरश: नजर स्तिमित करणारी संगमरवरी मशिदीची इमारत मन वेधून घेत होती. तिथं जाऊ म्हटलं, तसं एक जण म्हणाला.
 "सर, जायला काही हरकत नाही, आज मशिदीमध्ये वार्षिक जलसा चालू आहे.खूप गर्दी आहे.”
 मघाशी मला नायब तहसीलदार अब्दुल्लाने सांगितलं होतं. “काय स्वरूप आहे या जलशांचं?" मी विचारलं.

 “तुम्हाला आम्ही मघाशीच सांगितलं. इस्लामी धर्मशास्त्राचं हे सर्वात मोठं केंद्र आहे. ब्रिटिशांच्या जमान्यात मुस्लीम समाजावर इंग्रजी शिक्षा व तौर-तरीकांचा अनिष्ट प्रभाव पडून इस्लामी समाज भ्रष्ट होऊ नये व त्या वेळी मोडीत चाललेली मदरसा शिक्षणाची व्यवस्था पुनर्जीवित करावी म्हणून देवबंद ‘दारुल उलुम' ची स्थापना झाली. इथल्या कुलगुरूंनी ('दारुल उलूम' च्या प्रमुखास व्हाईस चान्सेलर असं म्हटलं जातं. त्यांच्यातर्फे प्रसिद्ध होणा-या इंग्रजी पुस्तकात 'व्हाईस चान्सेलर' असंच संबोधन प्रत्येक वेळी आलेलं आहे. हे विशेष नोंद घेण्यालायक आहे.) गावोगावी मशिदीच्या

३९२ ■ लक्षदीप