पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सर्कस संपल्यावर त्याला भेटत;ही त्याच्या ठायी अतीव आनंदाची बाब होती!
 छोटूला टॅपीजचं एक प्रेक्षक म्हणून आकर्षण होतचं,पण सर्कसमध्ये आल्यावर टॅपीज खेळातला थरार त्यानं जवळून अनुभवला.शंभर शंभर फूट उंचीवर दोरीच्या साह्यानं गिरक्या घेणं, पाळणे बदलणं वा हवेत एक दोन उड्या घेऊन जाळीत स्वत:ला झोकून देणं -मृत्यूच्या सीमारेषेला भिडलेल्या या खेळात विलक्षण रोमांच होता,जो छोटूला भावला आणि वेंकटस्वामीच्या प्रोत्साहनानं त्यानं टॅपीजचे धडे गिरवले,त्यात नैपुण्य कमावले.आणि याला विदूषकी चाळ्यांची जोड देत टॅपीजचे प्रयोग करीत प्रेक्षकांना एकाच वेळी हास्य व थरार छोटू देऊ लागला.
 खर तर त्याचं टॅपीजवरील काम इतर टॅपीज आर्टिस्टपेक्षा जास्त धोकादायक होतं.प्रेक्षकांना ते पाहताना कदाचित जाणवतही नसेल पण वेंकटस्वामी प्रत्येक वेळी त्याला मायेनं म्हणत,“जरा सांभाळून छोटू! तुझं काम जादा खतरनाक आहे.कारण तुला टॅपीज आर्टमधलं सर्व काही करावं तर लागतचं,पण ते करताना त्यातलं काही जमत नाही असं प्रेक्षकांना दाखवून चुका कराव्या लागतात आणि एकदा तरी घसरून पडावं लागत! ते तू कौशल्यानं करतोस,पण धोका आहे बाबा,तेव्हा जरा सांभाळून!
 या विदूषकी वळणाच्या साहसी टॅपीजमुळे छोटू हा खरा अर्थानं सर्कसचा स्टार बनला होता!
 हा काळ त्याच्यासाठी मंतरलेला होता.एका विलक्षण धुंदीत तो जगत होता.सर्कस हे त्याच्या अवघ्या जीवनाचं केंद्र बनलं होतं!
 वेंकटस्वामींनी पुणे मुक्कामी हिशोब व अन्य व्यवस्थापकीय कामांसाठी नंदू कामत या चुणचुणीत तरुणास सर्कसमध्ये घेतले.त्यानं छोटूचे खेळ पाहिल्यावर त्याची आपणहून ओळख करून घेतली आणि काही दिवसांतच ते दोघे जिवाभावाचे मित्र बनले!
 नंदूला वाचनाचा खूप शौक होता.ज्या गावी सर्कसचा मुक्काम असेल,तिथल्या लायब्ररीतून पुस्तके आणून फावल्या वेळात वाचणे हा त्याचा विरंगुळा होता.आणि हे वाचलेलं तो मूड आला की छोटूला सांगायचा.असंच एकदा त्यानं सांगितलं,
 “छोटू - मी नुकतीच मराठीतले एक श्रेष्ठ लेखक पु. भा. भावे यांची एक कथा वाचली आहे.सार्थक' तिचं नाव.एका सर्कसमध्ये मृत्युगोलात मोटारसायकल चालवणे हे नायकाचे काम.या पाच मिनिटांच्या धुंदीवर तो उरलेले तेवीस तास पंचावन्न मिनिटे काढीत असे. किती वास्तव आहे नाही!आणि किती कठोर वास्तव आहे.सर्कस कलावंतांना त्यांच्या कामाखेरीज काही अस्तित्व असू नये!माणूस म्हणून त्याची आयडेंटिटी,ओळख वा अस्तित्व असू नये!”

 "नंदू", जरा विचार करून छोटू म्हणाला,“हे मला पटत नाही.परंतु माझ्यावरून सांगतो, या सर्कसच्या तंबूबाहेरही माझं अस्तित्व आहे,विश्व आहे.मी

लक्षदीप ॥ ३७