पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

केवळ बुटका जोकर नाही,तर माणूस आहे.आपल्या सर्कसची टॅपीज क्वीन लीना- ही मला किती मानते - मला ‘सर' म्हणते.मी तिचा टॅपीजमधला गुरू आहे.तिला ही विद्या मीच शिकवली -" क्षणभर छोटू भरकटत गेला.कारण त्याच्या नजरेसमोर ती लावण्यावती तरळत होती.नकळत आपली कानशिले गरम होताहेत असा त्याला भास झाला.पण समोर नंदू होता व एका गंभीर विषयावर चर्चा चालली होती.
 “एक आणखी उदाहरण द्यायचं झालं तर राज कपूर मला आपला दोस्त मानतो.शूटिंगच्या वेळी आम्ही जवळ आलो.मध्यंतरी मी त्याच्या लोणीच्या फार्म-हाऊसवर गेलो.तेव्हा त्यानं किती अगत्यानं मला ठेवून घेतलं.माझा पाहुणचार केला.आता तूच सांग - आम्हा सर्कस कलावंतांना बाहेरच्या विश्वात काहीच स्थान नाही - माणूस म्हणून काहीच महत्त्व नाही?"
 “छोटू - तू खरंच फार भाबडा आहेस.जगानं आजवर तुला कुचेष्टा व अवहेलनेखेरीज काय दिलं? तरीही तुझा आशावाद प्रबळ आहे.मी मनापासून प्रार्थना करीन की, तुला स्वत:बद्दल जे वाटतंय ते खोटं ठरू नये - कधीच!”
 नंदूची ती सदिच्छा होती की अनिष्टसूचक भविष्यवाणी?.....
 खळखळून हसण्याचा आवाज त्याच्या कानी पडला व तो भानावर आला.सायंकाळ होत आली होती.तंबूमध्ये लीना इतर टॅपीजचा खेळ करणाच्या मुली आल्या होत्या.त्यांनी जाळी बांधायला सुरुवात केली होती.उजेड कमी असल्यामुळे लाईटसही लावले होते.
 खरं तर आज सुट्टीचा दिवस, पण लीना रोजचा सराव कधीच चुकू देत नसे.हा छोटूच्याच शिस्तीचा परिणाम होता.तोही दैनंदिन सराव कधीही चुकवत नसे.मनाच्या त्या क्षुब्ध अवस्थेतही त्याला तिचं कौतुक वाटलं!
 तीन वर्षापूर्वी लीनानं सर्कसमध्ये प्रवेश केला होता.या पूर्वी दुस-या एका छोट्या सर्कसमध्ये सायकलिंगचे व टॅपीजचे छोटे-मोठे काम ती करीत असे.एरिनामध्येही वेंकटस्वामींनी तिला सायकलिंगच्या खेळासाठीच घेतलं होतं.पण तिचं टॅपीजचं ज्ञान पाहन तिला त्यांनी छोटूच्या हवाली केलं.त्यानं तिला टॅपीजमधील अनेक उच्चप्रतीचे खेळ शिकवले.ती नेहमी म्हणायची,“सरांमुळे मी आज एवढे अवघड टॅपीज गेम्स करू शकते!"
 प्रत्येक प्रयोगाच्या पूर्वी ती त्याच्या पाया पडून,त्याची परवानगी घेऊनच टॅपीज सुरू करायची - हा क्रम सरावाच्या वेळीही असायचा!

 आताही त्याचं मन किंचित उचंबळून आलं होतं.कालचा प्रसंग विसरून तिनं जर आपल्याला ‘सर' म्हणून हाक मारली तर तिच्यासमवेत आपणही सारं काही विसरून टॅपीजचे खेळ करू - नाना विक्षेप करून तिला हसवू,जसे नेहमी सरावाच्या वेळी हसवतो तसे!

३८ । लक्षदीप