पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 त्या सर्वात असूनही छोटू एकटा होता - अस्वस्थ होता.
 काल रात्री घडलेला तो प्रसंग आणि आज कानी आलेली राज कपूरच्या दु:खद निधनाची वार्ता -
 राजनच्या खटपटीला यश आलं आणि सिनेमा सुरू झाला.छोटू पाहता पाहता राज कपूर या महान कलावंतांच्या ‘जोकर'शी एकरूप झाला.काल घडले त्या प्रसंगाच्या पाश्र्वभूमीवर तर त्याला राजचं दु:ख आणि प्रेमजीवनात आलेलं वैफल्य अधिकच भिडून गेलं!
 सिनेमा संपला, सर्व जण पांगले तरी छोटू तसाच बसून होता.डोळ्यातून मुक्तपणे वाहणारी आसवंही आटली,तरी त्याची विमनस्कता कमी होत नव्हती!
 आकाशाचा वेध घेणारे सर्कसच्या तंबूचे भव्य कळस- तो विशाल परीघ-मध्यभागी कलावंत व जनावरांचे खेळ दाखवणारे रिंगण- वर वा-याच्या झुळकीसरशी मंदपणे हेलकावे घेणारे पाळणे-ज्यावर प्रयोगाच्या वेळी तंग,आकर्षक कपड्यात लीनाचं चवळीच्या शेगेसारखं चपळ शरीर लवलवायचं-सारंच भव्य,उत्तुंग आणि विशाल!
 अशा भव्य,उत्तुंग व विशाल सर्कसच्या तंबूत एकटाच मध्यभागी बसलेला साडेतीन फुटांचा ‘वनपीस' छोटू -
 त्या भव्यतेच्या पाश्र्वभूमीवर छोटूला आपली शारीरिक उंची तीव्रतेनं खुपत होती! स्वत:चा कमालीचा तिरस्कार आणि वांझोटा संताप वाटत होता.
 दहा वर्षापूर्वी जेव्हा छोटूनं पोटाची आग विझवण्यासाठी म्हणून सर्कसच्या दुनियेत प्रवेश केला, तोवरच्या जीवनात त्याच्या वाटेला सदैव कुचेष्टा व अवहेलनाच आली होती! पण सर्कसचे मालक वेंकटस्वामीसाठी त्याची साडेतीन फूट उंची - हा बुटकेपणा ही जमेची बाजू ठरली.प्रत्येक सर्कशीमध्ये दोन तीन बुटके जोकर होतेच.त्यांचा एक बुटका जोकर पक्षाघाताने आजारी पडून विकलांग झाला होता. म्हणून बाळगोपाळांना,प्रौढातल्या बाल्यांना आपल्या विदृषकी चाळ्यांनी मनमुराद हसविणारा एक जोकर त्यांना हवाच होता!

 छोटूची बौद्धिक झेप मात्र अफाट होती.खरं तर त्याला अभिजात कलावंतच म्हणायला हवं! यशावकाश वेंकटस्वामींना त्याचा प्रत्यय आला.पाहता पाहता छोट सर्कसचं एक प्रमुख आकर्षण बनला! त्यानं पूरक प्रयोगांच्या मधे मधे कलावंतांना पूर्वतयारीसाठी वेळ मिळावा आणि प्रेक्षकांना रिलीफ मिळावा म्हणून सर्कशीमधले जोकर्स जे बटबटीत,खालच्या दर्जाचे चाळे करीत त्याना पूर्णपणे फाटा देऊन एका ढोबळ कथासूत्राच्या आधारे सतत तीन घंटे वाहते ठेवणाच्या प्रसंगांची हास्यस्फोटक मालिका रचली,ती प्रेक्षकांना कमालीची आवडली.सर्कसला येणारे बालगोपाळ तर त्याच्यावर निहायत खूश असत!अनेक उत्साही बाळगोपाळ त्याची स्वाक्षरी घेत,

३६ । लक्षदीप