पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/361

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

६. स्वातंत्र्योत्तर भारतीय प्रशासनाची ६०वर्षे ‘सिक्स थिंकिंग हॅट'च्या तंत्राद्वारे

 "Of no country can it be said more truly than of India that Government is administration."
 "Without the Civil Service, indeed, Government itself would be impossible..."
 १९३० साली इंडियन कॉन्स्टिट्यूशन रिफॉर्म कमिशन'चे अध्यक्ष सायमन (तेच ‘कु’प्रसिद्ध सायमन, ज्यांना 'चले जाव' म्हणताना लाठी हल्ल्यात लाला लजपतराय जखमी झाले व नंतर निधन पावले), यांनी आपल्या अहवालात ब्यूरॉक्रसी संदर्भात वरील दोन ठळक निरीक्षणे नोंदवली आहेत. आजही ती कालबाह्य झालेली नाहीत, उलट त्या काळापेक्षाही आज ती अधिक खरी वाटतात. त्याचे कारण सांगताना सायमन कमिशनने लिहून ठेवले आहे, "The Civil service of India, which in origin was little more than revenue collecting agency, gradually took upon itself a very wide range of duties. As work become specialized, new services has to be created... India looks to Government to do many things which in the west done by private enterprise."
 मागील साठ वर्षांच्या भारतीय प्रशासनाच्या वाटचालीचा आढावा घ्यायचा झाला तर असं म्हणता येईल की, आम्ही भारतीयांनी सायमनचे वरील निरीक्षण, ('Government is administration' म्हणजेच नोकरशाही) कालबाह्य वा प्रशासनाचे एक अंग न करता तेच एकमेव अंग करण्याचा चंग बांधीत सर्व काही शासनानेच करायचे (कारण त्याला जनहित कळते) या पद्धतीने नोकरशाहीचा विस्तार केला आहे. हा विस्तार जसा संख्यात्मक आहे, तसा तो कामकाजाच्या संदर्भातही आहे. पण गुणवत्तेच्या संदर्भात?

 स्वातंत्र्योत्तर भारतीय प्रशासनाच्या साठ वर्षाच्या कालखंडाचा आढावा या अध्यायात आपण घेणार आहोत, तो एका अभिनव पद्धतीने - ‘सिक्स थिंकिंग हॅट'

लक्षदीप ■ ३६१