पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/342

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करतात. तो नवसाला पावतो व मनोकामना पूर्ण करतो अशी श्रद्धा आहे.
 “म्या-म्या, माजं आत्तेच्या मुलाशीच लगीन व्हावं, तेनं शहरात नटव्या बाईला तिथल्या शानशौकीला भुलूनशानी डोरलं बांटू नये म्हणूनशानी म्या नवस बोलला होता आन् कंदुरी केली होती."
 त्या तरुणीची फिर्याद वाचताना चंद्रकांत विमनस्क झाला. तिचं विवाहाचं स्वप्न त्या निघृण बलात्कारानं भंगलं गेलं होतं. तिच्या आत्याचा मुलगाच काय, पण समाजातील कोणताही तरुण तिला या मागासलेल्या भागात स्वीकारणं शक्य नव्हतं. तिचा नवस व कंदुरी वाया गेली होती.
 त्या दोघी इथं आल्यावर कंदुरीसाठी बकरं घेण्यासाठी व ते कापून देण्यासाठी जत्रेच्या जवळच असलेल्या खाटिक गल्लीत गेल्या होत्या. तिथं त्या दोघींना ते आरोपी तरुण भेटले. त्यांच्या शिकारी नजरेनं त्या दोघी परगावाहून उरुसासाठी आलेल्या आहेत हे हेरलं.
 ‘आमी दोगी पयल्यांदाच इतकं दूर उरुसालं आलो व्हतो. त्यामुळे ते तिघे आम्हास्नी मदत करणा-या भावापरमाणे वाटतले. तेंनी कंदुरीसाठी बक-याचा सौदा जमवून दिला. मंग आमास्नी होटलात जेवायला चलण्याचा अग्रेव केला. आम्ही जलमात कंदी हॉटेलात जेवलो नव्हतो, मनुनशानी व्हय म्हनलं."
 चंद्रकातला बासू भट्टाचार्यांच्या 'आस्था' या सिनेमाची आठवण झाली. त्यातील मध्यमवर्गीय नायिकेला पंचतारांकित हॉटेलच्या चकचकीत वातावरणाचा मोह पडतो व एका अनोळख्या माणसाला वातानुकूलित खोलीत देह देत त्या वातावरणाचा उपभोग घेते, हे पाहताना चंद्रकांतला धक्का बसला होता. काहीतरी असंभाव्य व अतयं पाहात आहोत असं त्यावेळी त्याला वाटलं होतं. पण आज बासू किती सच्चा व काळाच्या पुढे होता हे जाणवून गेलं. खेडेगावात शेतमजूर म्हणून काम करणाच्या मुलीला शहरातील उंची हॉटेलमध्ये जेवण व सिनेमाला जाणं याची भूल पडू शकते, नव्हे, त्यात असंभव असं काही नसतं हे प्रत्ययास येत होतं.
 फिर्यादीमधील पुढील भाग म्हणजे गल्लाभरू हिंदी सिनेमात शोभणारा घटनाक्रम होता.
 त्या दोघींना त्यांनी शहरातल्या बड्या हॉटेलात मटणाचं सामिष भोजन दिलं होतं. त्याचवेळी त्यांना माहीत नसलेलं पेयही थोडं पाजलं. “ते काय व्हतं माहीत नाय मला पण तेची चव नाय आवडली पहिल्या झुट. पण तेंनी मोप आग्रव केला, हणूशान आम्ही दोघी गुमान ते पियेलो."

 भोजनानंतर ते तिघे या दोघींना घेऊन सिटीलाईटमध्ये चित्रपटाला गेले. बी व सी ग्रेडचे मल्याळी व तामिळी व सेक्सी हिंदी व इंग्रजी सिनेमे तिथे दाखवण्यात येत. त्यासाठी ते टॉकिज कुविख्यात होतं. तिथं एक सॉफ्ट पोर्नोग्राफिक सिनेमा चालू होता.

३४२ ॥ लक्षदीप