पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/341

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

घेऊन सुटतात. इथं प्राथमिक चौकशीप्रमाणे संशयित म्हणून प्रदीप जाधवचे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षांच्या लाडावलेल्या व माजलेल्या पुत्राचे नाव घेतले जात आहे. त्यामुळे डॉक्टरांवर राजकीय दडपण येण्याची शक्यता आहे, म्हणून त्यांना बोललं पाहिजे.”
 कलेक्टरांनी सिव्हिल सर्जनला फोनने स्पष्ट कल्पना दिली. “वैद्यकीय तपासणी पूर्ण झाल्यावर डॉक्टरांचा अहवाल तुम्ही स्वतः नजरेखालून घाला आणि पुणे खात्री करून घ्या. तो अहवाल पोलिसांना देण्यापूर्वी मला समक्ष दाखवा.”
 गतवर्षी शासनाच्या दलितमित्र पुरस्कार समारंभाच्या वेळी कलेक्टरांना एका कार्यकर्त्याने गौरवताना, “दलित, मुस्लीम समाज व स्त्री जातीचे तारणहार व मसीहा' असं म्हटलं होतं. त्याची चंद्रकांतला आठवण झाली. त्याचा उल्लेख करून तो म्हणाला, “सर, ते विशेषण नव्हतं तर वस्तुस्थिती होती व आहे. हे आज मला पुन्हा एकवार प्रत्ययास येत आहे.'
 “चंद्रकांत, यामध्ये मी विशेष काही करतो आहे असे नाही. ते माझे कर्तव्य आहे, तसं त्यामागे एक फिलॉसॉफी आहे, ती तूही लक्षात ठेव." किंचित आत्ममग्न होत कलेक्टर म्हणाले,
 “आपल्या देशात आर्थिक विषमतेपेक्षाही सामाजिक विषमता अधिक प्रखर आहे. त्याला हिंदू समाजातलं चातुर्वर्ण्य, खास करून दलितांबद्दलची तुच्छता, आणि उतरंडीची समाजरचना कारणीभूत आहे. या वर्गात मी भारतीय स्त्रीला बसवतो. तीही समाजरचनेची व त्याच्या अन्यायाची अनिवार्य बळी आहे. हे अत्याचार व शोषण निवडणुकीच्या राजकारणामुळे दिवसेंदिवस वाढत चाललंय. कारण मतांच्या राजकारणात जादा लोकसंख्येच्या जातीचे गट प्रबळ ठरतात व सत्तास्थानी येतात. ते आपल्या गट, जाती आणि त्यांच्या उच्चस्थानाला व आर्थिक हितसंबंधाला जपताना दलित व स्त्रीजातीला अधिकच दडपून ठेवण्याचे धोरण स्वीकारतात. त्यामुळे प्रशासनावर त्यांच्या रक्षणाची जबाबदारी आहे असं मी मानतो. तीच बाब अल्पसंख्याकांची आहे. त्याबाबतही मी संवेदनक्षम आहे म्हणून या वंचितांसाठी मी काही केलं असेल तर मी माझं कर्तव्यच आहे असं मी मानतो. जेव्हा या बलात्कारींना पोलीस तातडीने पकडून त्यांच्यावर खटला भरतील आणि त्यांना शिक्षा होईल, तेव्हाच मला समाधान वाटेल."
 बलात्कार झालेल्या दोघींपैकी एक अठरा-वीस वर्षांची तरुणी होती, तर दुसरी नुकतीच वयात आलेली पंधरासोळा वर्षांची किशोरी होती. त्या दोघी शेतमजूर होत्या. त्या इथल्या उरुसासाठी आल्या होत्या.

 मुल्ला फारूख चिश्तीच्या नावाने भरणारा या शहराचा उरूस फार प्रसिद्ध आहे. त्यासाठी हिंदू - मुस्लीम दोघेही नवस बोलून त्या फकिराच्या नावे बकरी कापून ‘कंदरी'

लक्षदीप ॥ ३४१