पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/320

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दररोज सायंकाळी एकत्र असायचो. चहा, गप्पा आणि संमेलन यशस्वी करण्यासाठी काय नवं केलं पाहिजे याचं दररोजचं ‘ब्रेन स्टॉर्मिंग' सेशन... मला जर ते चार महिने पुन्हा जगता आले तर मी आनंदाने तयार होईन, एवढा तो कालखंड भारावलेल्या मन:स्थितीचा होता! संमेलन संपलं, साहित्य उत्सव संपला की पुढे त्या शहरात मरगळ येते. परगभणीत तसं होऊ नये म्हणून आम्ही दहा लाख रुपयांचा निधी वाचवला व ‘अक्षर प्रतिष्ठा' नामक एक साहित्यिक संस्था स्थापून, पुढील काळात वर्षभर विविध साहित्यिक उपक्रम सुरू राहतील याची तरतूद केली. संमेलनाची ही सर्वांत मोठी उपलब्धी मी समजतो.
 असा हा माझा पर्भरणीचा हा कालखंड, माझ्यासाठी मनात परभणी हे स्थान कायम व खरं आहे. इथंच माझी ख-या अर्थानं साहित्यिक कारकिर्द सुरू झाली. “अंधेरनगरी' ही लोकप्रिय कादंबरी व 'अंतरीच्या गूढगर्भी' हा कथासंग्रह इथं असतानाच प्रकाशित झाला व ‘इन्किलाब विरुद्ध जिहाद'चे लेखनही इथंच निम्याहून अधिक पूर्ण झालं! त्याशिवाय डझनभरापेक्षाही जास्त जिवाभावाचे मित्र मिळाले. आर. डी. सी. म्हणून प्रशासकीय कामाचं समाधान मिळालं व इथूनच मी पदोन्नतीवर अप्पर जिल्हाधिकारी म्हणून औरंगाबदला गेलो. माझी ‘प्रशासननामा' ही प्रशासकीय अनुभवावर आधारित कथा-कम-लेखमाला २००१ मध्ये दैनिक 'लोकमत'च्या रविवार पुरवणीत प्रसिद्ध झाली व ती आता पुस्तकरूपाने या वर्षी येत आहे, त्यातले तीन चतुर्थांश अनुभव, ज्यातून माझी प्रशासकीय कार्यक्षमता सिद्ध झाली, ते परभणीचेच आहेत हे मला नमूद करावेसे वाटते. म्हणूनच परभणी आजही माझ्या मनात घर करून आहे.,
 परभणीनं जसं माझं व्यक्तिमत्त्व घडवलं व ते शहर जसं माझ्या भावविश्वाचा भाग बनला, तसंच - किंबहुना त्यापेक्षा अधिक माझं प्रशासकीय द सांस्कृतिक व्यक्तिमत्त्व चौफेर फुलून आलं, ते हा लेख लिहिताना. कोल्हापूर हे शहर सोडून मला अवघे दोनच महिने झाले आहेत, अजूनही ते शहर सध्या मनात किती खोलवर रुजलं आहे, हे क्षणोक्षणी जाणवतं. माझी कलेक्टर म्हणून साडेतीन वर्षाची कोल्हापूरची कारकिर्द ही सर्वार्थानं माझ्या करिअरचा गौरीशंकर होता असं म्हटलं तर वावगं ठरू नये. प्रशासन, इ-गव्हर्नन्स, कला, क्रीडा, उद्योग, वित्तसेवा, शेती व संस्कृती या सर्वच क्षेत्रात मी नव्या नव्या योजना आखून जिल्ह्याच्या विकासात योगदान द्यायचा मनापासन प्रयत्न केला आणि त्याद्वारे माझं भावविश्व समृद्ध झालं आणि करिअर कृतार्थ झालं.

 कलेक्टर हा जिल्हा स्तरावर शासनाचा चेहरा आणि डिलिव्हरी सिस्टीम वा अंमलबजावणी करणारी यंत्रणा आहे. तो जिल्ह्याचा समन्वय अधिकारी म्हणून 'फर्स्ट अमग इक्वल असतो. ब्रिटिश काळापासून कलेक्टर पद असल्यामळे त्याला पदाचे काही अंगभूत अधिकार प्राप्त आहेत. पण, त्यापलीकडे जाऊन लोकमानसाला असं

३२० । लक्षदीप