पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/319

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

थक्क होऊन पाहात होते व तीन तासांची शोभायात्रा एन्जॉय करीत होते.सुमारे वीस हजार लोक त्यात सामील होते.परभणीचा हा रेकॉर्ड अबाधित राहील असं वाटतं.सायंकाळी माझ्यासमोर वाजपेयींनी त्यांच्या पत्नीला फोन लावला होता आणि शोभायात्रेचं वर्णन करताना त्यांना किती व कसं सांगू झालं होतं.हे मी का केलं? ग्रंथदिंडीला शोभायात्रेचं रूप का दिलं?माझी त्यामागची एक विशिष्ट भूमिका व विचारधारा होती. कलावंत व साहित्यिक ही समाजाची सर्वात मोठी अमूल्य ठेव असते.ते सर्व पिढीचे आयकॉन असतात - असावेत.पण आज भारतात राजकीय - नेत्यांना जो सन्मान मिळतो, तो चुकीचा नसला तरी त्यांच्यापेक्षाही कलावंत, साहित्यिक मोठे असतात हे समाजमनावर बिंबलं गेलं पाहिजे. मी नेहमी डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे यांच्या एका निबंधाचा हवाला माझ्या भाषणात देत असतो. ज्या देशात ग्रंथसत्ता, पर्यायाने ज्ञानसत्ता चालते तो देश ग्रंथकार म्हणूनच मोठा ठरतो. कुठल्याही देशाची ओळख व अस्मिता त्या देशाचे कलावंत, लेखक, खेळाडू व वैज्ञानिकांमुळे असते. ब्रिटनचं महत्त्व व महत्ता शेक्सपिअरमुळे आहे, तर भारताची अस्मिता ही प्रेमचंद, रवींद्रनाथ टागोर, शरच्चंद्र चट्टोपाध्याय, मेजर ध्यानचंद, लता मंगेशकर, भीमसेन जोशींमुळे आहे, असते. पण व्यवहारात त्याचं प्रतिबिंब उमटत नाही. त्याची समाजाला जाणीव व्हावी म्हणून मी शोभायात्रेला एवढे भव्य रूप दिले. या संमेलनाचे खरे हिरो नारायण सुर्वे - हा युग-प्रवर्तक कामगार कवी आहे हे मला ठसवायचे होते! ही शोभायात्रा माझ्या आठवणींचा एक मनोहारी ठेवा आहे व तो कायम राहील.
 संमेलन हे केवळ आयोजन करणा-या रावसाहेब जामकरांच्या शिक्षण संस्थेचे नव्हते, ते पूर्ण गावाचे असले पाहिजे, यासाठी मी अनेक उपक्रम योजले. अगदी ऑटोरिक्षावाल्यांचीही बैठक घेऊन रेल्वे स्टेशन व बसस्टॅडवरून येणा-या संमेलनाच्या प्रेक्षकांना अदबीने व फक्त दहा रुपयांत संमेलनस्थळी सोडावे हे त्यांच्याकडून मान्य करून घेतले. कॉलेजचे विद्यार्थी, महिला मंडळे, सर्व शाळा - कॉलेजचे शिक्षक, जिल्ह्यातील सर्व वाचनालयांचे ग्रंथपाल व जिल्ह्यातील सर्व लहान-मोठ्या साहित्यिकांना हे संमेलन आपले वाटावे यासाठी त्यांच्याशी पुन्हा पुन्हा संवाद साधला. अगदी कलेक्टर (संधूसाहेब हे स्वत: उर्दू शायर व साहित्यप्रेमी) पासून सर्व अधिका-यांना स्वागत मंडळाचे हजार रुपये भरून सभासद करून घेतले. ग्रंथ-दालन व प्रदर्शन हे संमेलनाचे प्रमुख आकर्षण असते, त्यांनाही आम्ही भोजनाचे पास दिले व निवास व्यवस्था केली.

 हे सारं आम्हास एकदम सुचलं असं नाही. त्यासाठी पण मी एक दंडक घातला. दररोज सायंकाळी सात ते साडे-नऊ दहा, संमेलन कार्यालयात कार्यकारी समिती व साहित्यिकांनी जमायचं. गप्पा - गोष्टींतून नव्या कल्पना सुचायच्या,त्याची त्याच दिवशी अंमलबजावणी करायची. जवळपास चार महिने आम्ही पंचवीस-तीस जण

लक्षदीप ॥ ३१९