पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/281

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नायगरा पाहू या. स्वच्छ ऊन आहे, आकाशही निरभ्र आहे... आज सर्वांगाने नायगरा दिसेल."
 आम्ही 'मेड ऑफ दि मिस्ट' (Maid of the Mist) या बोटीच्या प्रवासाची तिकिटे काढली आणि आम्ही प्रथम ‘ऑब्झव्हेंशन टॉवर' या प्रॉस्पेक्ट पॉईंट वरील इमारतीकडे गेलो.हा टॉवर धबधब्यापेक्षा उंचीवर आहे व फिकट हिरव्या पोपटी रंगाच्या कांचेचा आहे.मनात आलं,यातही अमेरिकनांची कलात्मकता दिसून येते.नायगरा नदीच्या पाण्याशी मिळताजुळता रंग काचमहल (टॉवर) चा ठेवला आहे.सूर्यप्रकाशात जेव्हा तो चमकतो,तेव्हा पांचूच्या रंगविभोर बेटाचं दर्शन झाल्याचा साक्षात्कार होतो.आज स्वच्छ उन्हानं तो दिमाखात चमकत होता.रात्री जेव्हा रोशणाई होईल,तेव्हा पुन्हा एकदा मघाशी निसर्गाची पानांच्या रंगाची रंगपंचमी पाहिली,तशी मानव निर्मित विद्युत रोशणाई पाहायला मिळेल, तेव्हा हा टॉवर, हा वेगानं कोसळणारा धबधबा दिसेल? कल्पनेनंही मन मोहरत होतं!
 ऑब्झर्व्हेशन टॉवरवरून तिन्ही धबधबे अंतरावरून पण समग्रपणे दिसत होते! प्रचंड वेगानं घनगर्द आवाजात हुंकार देत तीन धबधबे खोल दरीत कोसळत होते. अमेरिका हद्दीमधील दोन्ही फॉलची उंची (खालून मोजली तर) वा खोली (वरून खाली मोजली तर) १८० फूट आहे, तर रुंदी १०६० फूट किंवा ३२० मीटर आहे. कॅनेडियन फॉलची उंची अंमळशी कमी म्हणजे १७० फूट (५४ मीटर) तर रुंदी दुपटीहन जादा म्हणजे २२०० फूट (६७५ मीटर) एवढी आहे. सुमारे १२,००० वर्षापूर्वी निर्माण झालेले हे तीन धबधबे तेव्हापासून अव्याहतपणे खळाळत, वेगानं धावत येत कड्यावरून बेगुमानपणे स्वत:ला खोल झोकून देत आहेत. आपल्याच आत्ममग्न मस्तीत ... पण पाहाणा-याला अवर्णनीय आनंद देत! खाली वेगानं पडताना जे पाण्याचे तुषारकण वर येत होते, ते एवढे असंख्य होते की, त्याचा दाट धुक्यासारखा लोट झाला होता व तो अस्मानात झेपावत होता. ते अविरत पडणारं प्रचंड पाणी, तो एकसारखा गंभीर नाद आणि पडणाच्या पाण्याचं शुभ्रफेनिल सौंदर्य... केवळ अप्रतिम! हा नाद अनादी आहे, असजेय आहे... हे स्वर मानवाचा नाही, देवाचा आहे.,

 एकदम काल वाचलेली नायगराची आणखी एक कविता वाचली, त्याची सुरवातच मुळी "Here speaks the Voice of god let man be dumb / Nor with his vein aspirings hither come" अशी सार्थ होती. इथं या क्षणी नायगरा परिसरात दहा ते पंधरा हजार माणसे खचितच असतील. त्यांचा कोलाहलही चालू होताच. पण त्यावर मात करीत नायगरा एका विशिष्ट नादात आवाज करीत होता. तो, तो देवाचा तर आवाज नाही? माणसानं मूकपणे ऐकवा असा! कसलं अनाम, शब्दविहीन उत्कट खर्जातल्या स्वरात नायगरा गात होता; का देवाचा आवाज, देव

लक्षदीप २८१