पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/280

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आमच्या सोबत पुढील २-३ तास राहाणार होता! मी प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं, तसं खुलासा करताना मित्र म्हणाला,
 नायगराचा भूगोल व इतिहास फार रंजक आहे. तसंच आपल्याला नायगराचं सर्व दिशा, अंग व कोनातून तो दर्शन घडवेल!”
 आणि खरंच, त्या गाईडच्यासह नायगरा पाहिला, तो केवळ अद्भुत, रोमांचकारी व डोळ्याचं पारणं फेडणारा अनुभव होता. तसंच नायगारा हे जगातलं एक महान आश्चर्य का मानलं जातं, याचा उलगडाही झाला आणि नायगरा डोळ्यासोबत मनातहीं उतरत गेला!
 गाईड आम्हांला सर्वप्रथम धबधब्यांच्या अलीकडे नायगरा नदीचा प्रवाह पाहायला घेऊन गेला. नायगरा धबधब्याभोवती पर्यटकांची गर्दी असल्यामुळे तेथे हॉटेल्स, कॅसिनोसारखे व्यावसायिक बांधकामे होऊन परिसर सौंदर्याची हानी होऊ नये म्हणून ११० वर्षापूर्वी, म्हणजे १८९५ साली, न्यूयॉर्क राज्याने कायदा करून नायगरा धबधब्याचा परिसर आरक्षित करून तेथे ‘नायगरा रिझर्वेशन पार्क'ची निर्मिती केली. त्याचा मुख्य उद्देश नायगरा धबधब्याचं नैसर्गिक सौंदर्य अबाधित राहावं आणि पर्यटकांना थेट नदी व धबधब्यापर्यंत निर्धाक अडथळ्याविना जाता यावं हा होता. तो आजही किती काटेकोरपणे जपला जातोय, हे मला जाणवलं होतं!
 हे स्टेट पार्क ‘गोट आयलंड' व 'श्री सिस्टर्स' नावाने ओळखल्या जाणाच्या तीन छोटेखानी बेटावर विकसित झाले आहे. त्यामधून नायगरा नदी वाहते. त्याच्यावर बांधलेल्या पुलावरून जाताना नदीचं किंचित हिरवी व काळसर झाक असलेलं पाणी पाहून काही शेकडो मीटर अंतरावर त्याला प्रचंड वेग येऊन खोल दरीत पाणी फेकलं जाणार आहे, याची आधी धबधबा पाहिला नाही तर कल्पनाही येणार नाही. हा सारा पार्कचा परिसर मनमोहक हिरवळ, उंच वृक्षराजी व स्वच्छ, अंगात थंडी मुरवत आरामशीरपणे रपेट मारताना कमालीचं प्रसन्न वाटत होतं!
 गाईडनं माहिती दिली की, इथं एकूण तीन धबधबे जवळजवळ आहेत, ज्यांना एकत्रितपणे गावाच्या नावावरून 'नायगरा फॉल्स' म्हटलं जातं! ती म्हणजे अमेरिकन फॉल, 'ब्रायडल व्हेल फॉल्स' (Bridal veil) आणि कॅनेडियन फॉल, ज्याला 'हॉर्स शू फॉल' ही म्हटलं जातं. हा तिसरा धबधबा कॅनडा देशाच्या हद्दीत आहे. नायगरा नदी ही दोन देशांची या भागातही सीमारेषा आहे. तिन्ही धबधबे एकत्रित खाली नदीतून बोटीनं पाहाताना त्याची भव्यता, त्याचं अवर्णनीय सौंदर्य आणि पाण्याचं नितांत सुंदर शुभ्रपण टिपायला दोन डोळे कमी पडतात. कॅमे-याच्या प्रिंटवर उमटणारी क्षणचित्रं निर्जीव व केवळ भासमान वाटतात. नायगरा प्रत्यक्ष पाहाणं हाच एकमेव मार्ग आहे त्याचे सौंदर्य व भव्यता आकलण्याचा!

 मित्र घाई करीत होता. म्हणत होता, “आधी आपण खाली नदीतून बोटीनं

२८० । लक्षदीप