पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यांना समूहजीवनाच्या अंतरंगात डोकावता आले.त्याविषयीच्या आकर्षणामुळे ते सतत त्याकडे वळले असावेत,मुरूड,हैद्राबाद,सहारणपूर (उ. प्र.) व्हाया कारगिल,श्रीनगर,काबूल,कंदहार अशी भौगोलिक प्रदेशातील लेखन परिक्रमा आहे.स्थानिक मुस्लीम संस्कृतीपासून ते अफगाणमधील मुस्लीम जगाचा नकाशा तीमध्ये आहे.
 सामाजिक जीवनाची समस्याचित्रणे हा एक त्यांच्या लेखनाचा विशेष आहे.पाणी टंचाई, स्त्रीभ्रूणहत्या,बालमजुरी ते मुस्लीम स्त्रियांची दु:खे अशा समस्यांना तीमध्ये स्थान आहे.या प्रश्नांचा विविधांगी शोध त्यांनी ललित साहित्यातून घेतला आहे.एक जागृत लेखक म्हणून त्यांच्यात आजच्या काळाचा,समाजजीवनाचा निरीक्षक दडलेला आहे.स्वत: त्यांनी ‘बखर लिहिणा-या बखरकाराचा वारसा' आपल्यात असल्याचे म्हटले आहे.देशमुख यांच्या साहित्यातील विविध अनोख्या समाजजीवनाची समस्यांची ही दर्शने आहेत.अर्धशतकातील महाराष्ट्रातील काही जीवनक्षेत्राची ही समाजवृत्ते आहेत.वार्ताकने आहेत.प्रशासनातील काही सामाजिक अहवाल आहेत,ते कथात्मसाहित्यातून मांडले आहेत.ही समाजचित्रे त्यांनी रिपोर्टाज लेखनशैलीत मांडली आहेत.त्यामुळे समाजचित्रणाच्या दृष्टीने त्यास महत्त्व आहे.
 ‘थीमबेस्ड कथा' हा देशमुख यांच्या कथासाहित्याचा एक वेगळा, अभिनव असा महत्त्वाचा पैलू आहे. एखादे मुख्य सूत्र घेऊन त्यासंबंधीच्या सलग कथामाला लिहिल्या आहेत. पाणी, स्त्रीभ्रूणहत्या व खेळाडूंच्या कथा या विषयावर त्यांच्या कथा प्रसिद्ध आहेत. एका विषयाची अनेक परिमाणे, कंगोरे शोधण्याचा हा प्रयत्न आहे. समकालीन समस्याचित्रणाच्या या विविधस्वरूपी कथामाला आहेत. या समस्यावरील उपायही लोकशिक्षकाच्या भूमिकेतून त्यांनी या लेखनातून मांडला आहे.
 लक्ष्मीकांत देशमुख यांचे कांदबरीविश्वही विविध स्वरूपी आहे. विविध समाजसमस्येचे चित्रण ते राजकारण व आंतरराष्ट्रीय दहशतवादाचे विषय तीमधून अभिव्यक्त झाले आहेत, मुस्लीम जगाची संवेदना, बालमजुरांचा प्रश्न, वर्णभेद ते देहनिष्ठ जाणिवांचे सूचन त्यांच्या कादंबच्यात आहे. जिल्हा प्रशासन ते नगरपालिका यांच्यातील सत्तासंघर्षाचा वेध त्यांच्या कादंबच्यात आहे. तर 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' या बृहद परिसंस्कृतीतील जीवनानुभवाला साद घालण्याची रीत आहे.

 प्रवासवर्णनपर व ललितगद्य या प्रकारातही त्यांनी लेखन केले. चेरापुंजी ते नायगारा अशा विविध प्रदेशांतील त्यांच्या मनावर उमटवलेला ठसा, तेथील समाजनिरीक्षणांच्या नोंदी तीमध्ये आहेत. नाटक, चित्रपट व कलाक्षेत्र ही काही त्यांच्या आवडीची क्षेत्रे. या विषयावरही त्यांनी सतत लिहिले आहे. प्रशासनविषयक लेखन हा देशमुख यांच्या लेखनाचा एक महत्त्वाचा अविष्कार आहे. ललितेतर स्वरूपाच्या या लेखनातून त्यांना जे विविध स्वरूपाचे अनुभव आले ते या लेखनातून मांडले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेपासून प्रशासनातील विविध अनुभवप्रदेशांचे हे चित्रण आहे.

लक्षदीप । २७