पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कथात्म साहित्य,नाट्यलेखन,वैचारिक व ललित स्वरूपाचे लेखन त्यांनी केले आहे.त्यांच्या एकूण साहित्याचे प्रातिनिधिक स्वरूपाचे हे संकलन आहे.त्यांचा लेखक म्हणून असणारा संवेदनस्वभाव व या काळाचा जवळचा संबंध आहे.
 त्यांच्या व्यक्तिमत्त्वात उत्तम असा प्रशासक आणि संवेदनशील असा लेखक अशी दुहेरी भूमिका आहे.संस्कारशील व्यक्तिमनाचा उभयान्वय त्यांच्या ठायी आहे.तळागाळातल्या शेवटच्या माणसाच्या विकासासाठी ध्येयधोरणे राबविणे या रचनात्मक कार्यासाठी जास्तीतजास्त उपयोग करून घेणाच्या अधिका-यांपैकी ते आहेत.प्रशासकीय सेवेत असताना तिथल्या विविधस्वरूपी अनुभवांचा अतिशय चांगला उपयोग देशमुख यांनी करून घेतला आहे.मराठीत इतक्या विपुलपणाने प्रशासकीय जीवनातले विषय क्वचितच आले असतील.त्यांच्या लेखनाची अनेक कथाबीजे त्यांच्या अनुभवसृष्टीत आहेत.या कथाबीजांचा विस्तार वेळोवेळी एक लेखक म्हणून देशमुख यांनी केला आहे.जिल्हा प्रशासन, न्यायपालिका ते प्रशासनयंत्रणेतील अनेक अनुभव त्यांच्या लेखनाचे विषय झालेले आहेत.पाणी टंचाई,महापूर,रोजगार हमी योजना,नागरी प्रशासन,ग्रामीण विकास,स्त्रीभ्रूणहत्या असे प्रश्न त्यांच्या कथात्म साहित्यात आहेत.या यंत्रणेतील बारकावे त्यामध्ये आहेत.'लेखकाला हे अनुभव टिपकागदाप्रमाणे टिपून घेता आले पाहिजेत' असे त्यांनी म्हटले आहे.
 जिल्हाधिकारी म्हणून जिल्हा प्रशासनातील विविध क्षेत्रांशी त्यांचा जवळून संबंध येतो.या पाहणीतून देशमुख अनेक विषय त्यांच्या कथा-कादंब-याचे झाले आहेत.पृष्ठस्तरावरून सर्व काही आबादीआबाद असणा-या या व्यवस्थेच्या तळाशी अनेकविध प्रकारचे गुंते असतात.समाजपयोगी अशा सेवाक्षेत्रातील अनेक गुंते देशमुख यांचे लेखनविषय झाले आहेत.सामाजिक दस्ताऐवजाचे स्वरूप या लेखनास आहे.तसेच रिपोर्ताज पद्धतीची प्रचिती या लेखनास आहे.

 मुस्लीम जीवनसंस्कृतीचे चित्रण हा देशमुख यांच्या एकूण लेखनाचा आस्थेचा विषय आहे.त्यांच्या कथात्म व वैचारिक लेखनातून मुस्लीम जीवनासंबंधीचे विषय पुन्हा-पुन्हा आवृत्त झाले आहेत.भारतीय लोकजीवनाचा अविभाज्य भाग असणा-या या संस्कृतीबद्दलचे कुतूहल त्यांना आहे.ते जीवन समजून घ्यावे अशी भावना तीमध्ये आहे.आधुनिक काळात भारतीय समाजाचा एकजीव भाग असणाच्या समूहाकडे काहीसे विपरीतपणे पाहिले जाते.ते टाळून वस्तुनिष्ठपणे व सहिष्णुतादृष्टीने या जगाकडे त्यांनी पाहिले आहे.सलोमी,इन्किलाब विरुद्ध जिहाद या कादंब-यात व अनेक कथांमध्ये या जीवनाचे चित्रण आले आहे.देशमुखांच्या या संस्कृतिप्रेमामागे मराठवाड्यातील निजाम राजवटीतील लोकजीवनाचा भाग असावा. बालपणीच्या घडणकाळातील व पुढेही सेवाकाळात निजाम राजवटीतील मुस्लीम संस्कृतीच्या खाणाखुणा, त्यांच्यावरील उर्दू वाङ्मयाची सावली,भाषेची जानपेहचान त्यामुळे

२६ ॥ लक्षदीप