पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भारतीय प्रशासनाची,इतिहासाची,तिच्या स्थित्यंतरासह त्यांनी मांडणी केली आहे.
 देशमुख यांच्या साहित्यभाषेचे स्वरूपही वैविध्यपूर्ण आहे.मात्र जीवनानुभवाच्या आशयसूत्राच्या प्रभावी ठशामुळे काही प्रमाणात साहित्यकृतीच्या रूपाकडे दुर्लक्ष झालेले दिसते.अभिनव अशा प्रकारची भाषारूपे आहेत.'थीमबेस्ड'सारख्या कथारूपाचा प्रयोग आहे.कथा-कादंबरीत पत्रात्मक लेखनतंत्र आहे. बृहद कादंबरीचा आकृतिबंध ‘इन्किलाब विरुद्ध जिहाद'मध्ये वैशिष्ट्यपूर्ण आहे.काव्यात्मता व यथोजित भाषेचा रूपबंध तीमध्ये आहे.देशमुख यांच्या कथात्मक सृष्टीत व ललित लेखनातील पात्ररचना ही दुहेरी स्वरूपाची आहे.समस्याकेंद्री अनुभवविश्वाचे चित्रण करताना त्यांच्या साहित्यात बरीचशी पात्रे खलप्रवृत्तीची असतात.मात्र त्याचवेळी त्या संहितेत सत्शील,आदर्शवादी किंवा सकारात्मतेचा ध्यास असणारी पात्रे वा निवेदक सुप्तपणे नांदत असतो.समांतरपणाने या दुहेरी स्वरूपाच्या पात्ररचनेतील आशावादाचे व आदर्शाचे सूचन केलेले आहे.मानवी वर्तनाचे अतर्क्स रूपही आहे.चित्रदर्शी आणि नाट्यात्मक अभिव्यक्ती आहे.

१३.

 १९८० नंतरच्या मराठी साहित्याचे स्वरूप हे विविधस्वरूपी आहे.साठच्या दशकातील चैतन्यशील अशा साहित्याचे अविष्कार ऐंशीच्या दशकात स्थिरावले होते.भालचंद्र नेमाडे,भाऊ पाध्ये,नारायण सुर्वे व नामदेव ढसाळ यांच्या खुल्या शक्यतांचा शोध घेणारी नवनैतिकतावादी साहित्याची उपस्थिती या काळात होती.मराठी मध्यमवर्गीयांच्या दृष्टीपल्याडच्या नव्या साहित्याचा हा आविष्कार होता.लघुनियतकालिकाच्या चळवळीचे व दलित साहित्याचे जोरकस आविष्कार या काळात प्रकट होत होते.तसेच ऐंशीच्या दशकातही इतरही अस्मिताकेंद्री साहित्यप्रवाह मराठी लेखन परंपरेत निर्माण झाले.मराठी सांस्कृतिक जगताच्या व अभिरुचीच्या कक्षा विस्तारणारे हे साहित्य होते.एक लेखक म्हणून देशमुखांची जडणघडण या सांस्कृतिक पर्यावरणात झाली.स्वत:च्या साहित्याचे आस्थाकेंद्र व विषयकेंद्र निवडण्याचे दोन पर्याय समकाळात त्यांच्या समोर होते.एक आधुनिकतावादी दृष्टीचा प्रभाव असणारा साहित्यप्रवाह आणि दुसरा मानवकेंद्री जीवनदृष्टी प्रभावित साहित्यप्रवाह.स्वाभाविक देशमुख यांचा लेखन संवेदनस्वभाव हा मानवकेंद्री विचार विश्वाकडे झुकणारा होता.या प्रभावी घटकांमुळे त्यांचा कल स्वाभाविकपणे समाजशील विषयाकडे झुकला,तसे विषय त्यांच्या लेखनातून मोठ्या प्रमाणात आविष्कृत झाले.अवतीभवतीच्या वेगवान उलाढालीला मराठी साहित्याने दिलेल्या प्रतिसादाच्या पाश्र्वभूमीवर देशमुख यांनी आपल्या अनुभव प्रदेशातील विषयांना केंद्र बनविले आणि त्या अनुभवांचा,सामाजिक वास्तवाचा प्रामाणिकपणे शोध घेतला. प्रशासनिक अनुभवाचे क्षेत्र व त्याच्या विविध परी लेखनातून मांडल्या.एकेक प्रश्न,

२८ ॥ लक्षदीप