पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/273

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अलीकडेच बसविण्यात आले होते. त्यांनी जे लेण्याबद्दल सांगितलं होतं, त्यामुळे एक काहीतरी नवा अनुभव मिळेल अशी अपेक्षा होती. आणि अपेक्षापूर्वीचा सुखद अनुभव मॅक्समाई केव्हज' पाहताना मिळाला. एका शब्दात हा अनुभव सांगायचं म्हटलं तर मी ‘फॅन्टॅस्टिक' हा शब्द वापरेन!
 आपल्या मराठी माणसाच्या नजरेपुढे लेण्या म्हटलं की वेरूळ व अजिंठा येतं. तेथे प्रज्ञावंत कलावंतांनी डोंगर कोरून जे उत्तुंग शिल्प साकारलंय - विशेषत: कैलास लेणं व अजिंठ्याची रंगिला गुंफा, त्याला तोड नाही. पण ‘मॅक्समाई’ लेण्याचं वैशिष्ट्यं म्हणजे ती निसर्गनिर्मित आहे. हा निसर्ग किती महान कलावंत आहे, याचा साक्षात्कार इथं आम्हास झाला आणि मन भरून तृप्तावलो.
 'मॅक्समाई’ लेणी म्हणजे एक नागमोडी गुहा आहे - साधारणपणे २०० ते २५० मीटर लांबीची व मध्यावर दोन बाजूने विभाजित झालेली. लाईमस्टोनचा दगडांचा डोंगर, त्यातली ही गुहा. तिथे छतावर व दोन्ही बाजूला अनेक वर्षांच्या नैसर्गिकप्रक्रियेने व पावसामुळे नानाविध आकृतिबंध तयार झाले होते. कलावंत, चित्रकारांना त्यांच्या मन:चक्षू व प्रतिभा विलासाद्वारे त्यात अक्षरश: अगणित चित्रमालिका दिसाव्यात, एवढे मनोरम आकार व आकृतिबंध नैसर्गिकरीत्या त्यात तयार झाले होते. ते पाहताना माझं मन स्तिमित होतं होतं. मला त्यात गणपतीच्या अनेक आकृत्या व पानाफुलांचे आकार जाणवत होते.
 गुहेमध्ये मेघालय पर्यटन विभागाने सोडियम व्हेपरचे विद्युत दिवे लावले होते. आमचं नशीब जोरावर होतं. आज ते चालू होते. पाऊस पडला की ते बंद व्हायचे. आज चेरापुंजीत सकाळपासून पाऊस नव्हता. म्हणून हळहळ करायची, की त्यामुळे काळोख्या गुहेत अद्भुत असं नैसर्गिक शिल्प पाहायला मिळालं म्हणून आनंद मानायचा? गुहेतल्या रोमांचक अनुभवामुळे आनंदाचं पारडं अर्थातच जड झालं होतं.
 गुहेतून जाणं व दुस-या तोंडातून बाहेर पडणं हा ट्रेकिंगचा आनंद मिळवून देणारा असा अनुभव होता. मुख्य म्हणजे गुहेत पावसाचे पाणी झिरपत असूनही कुठेही शेवाळलेलं नव्हतं. कारण वाहणारा थंडगार, आल्हाददायक चैतन्यमयी वारा.

 गुहेतून एका मुखातून दुस-या मुखात जाण्यासाठी रस्ता असा नव्हता. उंचसखल भाग - दरी - डोंगराचा छोटा अनुभव देणारा. दोन उंचवटा जागेच्या मध्ये चारपाच फुटांची खाई. त्यावरून जाण्यासाठी लवचीक पण मजबूत बांबू एकत्र करून टाकलेले व पायवाट तयार केलेली. त्यावरून जाताना बांबू वाकत होते. हरिद्वारच्या झुलत्या लक्ष्मण झल्याची आठवण येत होती. अंधाच्या गुहेत पिवळ्या दिव्यात नैसर्गिक आकृतिबंध टणटण करीत मंदपणे पडणा-या पाण्याच्या थेंबांच्या संगीताच्या साथीनं निरखताना अनोखी अनुभूती जाणवत होती. वेदांना भारतीय परंपरेत अपौरुषेय म्हटलं जातं, ते कितपत सत्य आहे. माहीत नाही. पण ही 'मॅक्समाई' नामक लेणी

लक्षदीप । २७३