पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/233

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्पष्ट होत गेले. गोपाळ म्हणाला, “आपल्या रिलेशनशिपमध्ये मी बायको - तू नवरा. पुढाकार तू घ्यायचास व मला चेतवायचंस-"
 केदारही त्याच्या बोलण्यानं खुलून आला. “होय मित्रा, मलाही असेच संबंध आवडतील!"
 देगावकर पूर्ण सभागृहात हिंडत होते. प्रत्येकाशी बोलत होते. एक समाधान त्यांना जाणवत होतं की, आपण एका सामाजिक समस्येचं समाधानकारक उत्तर शोधलंय, पण इथं येणारा प्रत्येकजण काही नैसर्गिकरीत्या गे टाईपचा - वृत्तीचा नव्हता. त्यांना चॉईस - पर्याय नव्हता म्हणून ते तसे झाले होते वा होणार होते. मुलींची संख्या एवढी कमी झाली होती की, अनेक मुलांना एकटं राहाणं भाग होतं. पण त्यांनाही नैसर्गिक भुका होत्या, त्याचे शमन कसे करायचं? समाजात वाढती समलैंगिकता हे त्याचं अपरिहार्य असणारं उत्तर होतं!
 म्हणूनच त्यांना आजच्या 'गे मैत्री संमेलनाची कल्पना सुचली होती. त्यांचा मित्र सेवानिवृत्त जिल्हाधिकारी उमाकांतच्या भाषेत सांगायचं तर आऊट ऑफ बॉक्स विचार व उपाय सुचला होता, पण मनात खोलवर एक भीती काट्याप्रमाणे सलत होती. महासत्ता झालेला समर्थ भारत आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे समान झाला होता. दारिद्रय व गरीबीचं पूर्णपणे उच्चाटन झालं होतं. आधुनिक शिक्षणानं नॉलेज इकॉनॉमीच्या जोरावर हे तीस वर्षात शक्य झालं होतं. पण शंभर टक्के शिक्षित भारत मुलींच्याबाबत साक्षर पण नव्हता. ठार परंपरागत वागत होता. त्याची परिणती अशी झाली होती. जगामध्ये कमी मुलींमुळे भारत लाफिंग स्टॉक बनला होता. आणि आपण आज जे पाऊल उचललं आहे, ते कितीही अपरिहार्य व गरजेचं असलं तरी ते फारसं काही नैसर्गिक नाहीये आणि खरं संसारसुख देणारं नाहीय. उद्या ते आम होणार तेव्हा लाफिंग स्टॉकची भारताची प्रतिमा अधिक गडद होणार...
 आता खरंच घड्याळ्याचे काटे उलट्या दिशेनं फिरवण्याची पाळी आली आहे. आता लिंगनिदान करून मुलाचा गर्भपात करीत पुढील काही वर्ष तरी मोठ्या प्रमाणात केवळ मुलींनाच जन्म दिला पाहिजे...
 देगावकर खिन्नसे हसले. आपले डोळे भरून आले आहेत असं त्यांना वाटलं. मन तर भारी जडशीळ झालं होतंच. त्यांनी चष्मा काढला, रुमालानं डोळे कोरडे केले. आणि पुन्हा चष्मा लावला.
 आणि त्यांची नजर सुरेंद्रवर गेली. त्यांचा नातू त्यांच्या नकळत तेथे आला होता. त्यानं आपला एक पार्टनर बहुतेक निवडला होता. तो तगडा होता.
 आज घरी आपण सुरेंद्रच्या जोडीदाराचं सून का जावयाच्या रूपात स्वागत करणार आहोत?

 प्रश्न खरंच कठीण होता!

लक्षदीप । २३३