पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/234

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
उपसंहार

 कांता, तुझ्या सूचनेवरून माझ्या अनुभवाच्या संचिताच्या आधारे ‘कांदे पोह्याची सेंच्युरी' व 'नकाराचा घटकार - पण मुलीकडून' या दोन केस स्टडीज अनुभवाच्या आधारे लिहिल्या, पण तुझी ही भविष्यात काय घडू शकेल याची कल्पना करून लिहिलेली ‘गे - वर-वर सूचक मेळाव्याची' स्टोरी अप्रतिम आहे. मनाला हादरून सोडणारी आहे."
 वार्षिक मेळाव्याला उमाकांत आला होता, आणि त्यानंतर दोन दिवस तो माझ्या घरीच राहिला होता. काल रात्रभर बहुधा तो जागा असावा. कारण दोनदा मी बाथरूमला जाताना त्याच्या खोलीतला प्रकाश पाहिला होता. मी हलकेच डोकावून पाहिलं. तो लॅपटॉपवर काम करीत होता. आज सकाळी ब्रेकफास्टच्या वेळी त्यानं मला हातात या केसस्टडीजची प्रिंटआऊट दिली. ती डायनिंग टेबलावरच चहा घेता घेता वाचून काढली. ‘कांता, ही तुझी केस स्टडी सर्व वृत्तपत्रात प्रसिद्ध व्हायला पाहिजे. चांगलं झणझणीत अंजन घालणारी ठरेल. कदाचित त्यामुळे काही प्रमाणात तरी जाणीव जागृती होईल!"
 आणि पाच वर्षाचा माझा नातू सुरेंद्र पळत पळत आला आणि खुर्चीवर चढत माझ्या मांडीवर बसत बोबड्या स्वरात सांगू लागला, “आबा, तुम्ही ममाला सांगा ना - आज मला स्कूल नको. या आबाच्या गाडीत बसायचंय... तो रेड लँप का लावला तुम्ही कार वर?”
 एकदम मला केस स्टडीचा कांतानं शेवट केलेला आठवला. माझ्या सुरेंद्रवर येऊन ती केस स्टडी संपली होती. काळजात एक कळ उठली व पत्नीनं गमतीनं म्हटलेलं आठवलं. जर आपला नातू सुमार निघाला तर -
 तर काय होईल याचं एक विदारक चित्र कांतानं रेखाटलं होतं!
 "उत्तम, मला खरंच माफ कर. मला ही केस स्टडी तुझ्या - एका मॅरेज ब्युरो चालवणा-यांच्या नजरेतून लिहायची होती, म्हणून सुरेंद्रचा संदर्भ आला. पुन्हा म्हणतो, आय अॅम सॉरी."
 ‘इटस ओ. के. कांता. माझी अस्वस्थता काही संपत नव्हती.
 त्यानंही ते ताडलं असावं. माझा हात हाती घेत म्हणाला, “प्लीज. असं काही होणार नाही - निदान सुरेंद्रच्या बाबतीत तरी. मी तुला एक सांगतो - मला नुकतीच नात झाली आहे. तिला मी देईन सुरेंद्रसाठी - झालं?"

 मी खुदकन हसलो. जड झालेलं मानस एकदम निवळू लागल्याची जाणीव झाली होती!

२३४ ॥ लक्षदीप