पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/226

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नाहीय, तर त्याला माझ्यावर रोज बलात्कार करायला, तुम्ही लग्नाच्या नावावर परवानगी देताय... पण एक नक्की करेन तुमच्यासाठी. मांडव परतणीला येईन ती तुम्हाला नवीन कोल्हापूरी चप्पल घेऊन. कारण लग्नानंतर देवीला जायचा त्यांचा कुळाचार आहे, म्हणून कोल्हापूरला जावं लागणार आहे. तिथली प्रसिद्ध चप्पल आणेन. पुन्हा ती कधीही झिजणार नाही."
 आणि त्या झिजलेल्या वहाणा ती आपल्या गालफडात मारून घेऊ लागली. मी क्षणभर अवाक होते. काय करावं हे सुचेनासं झालं होतं. मग भानावर येत तिच्या हातातून चप्पल हिसकावून घेतली व बाजूस टाकली. ती निस्त्राण होत माझ्या मिठीत कोसळली, “मला माफ कर आई. मला माफ करा बाबा."

दोन
२०११ नकाराचा सिक्सर - पण मुलीकडून!

 अमित माझा धाकटा भाऊ खरा, पण आम्हा दोघात जवळपास बारा वर्षांचं अंतर असल्यामुळे मुलासारखा आहे. आई-वडिलांचं सुख मी काही काळ तरी उपभोगलं, पण वयाच्या पाचव्या वर्षी अपघातात आई-बाप गमावल्यावर त्याच्या वाट्याला पोरकेपणच आलं होतं. मी नोकरीस लागताच लग्न केलं व त्याला मामाच्या घरून माझ्याकडे आणलं. आणि पोरकेपणाचा, मामाच्या घरी आश्रित म्हणून रहाताना त्याच्या मनावर उमटलेला ओरखडा मिटवण्याचा प्रयत्न मी व माझ्यापेक्षा माझ्या बायकोनं - त्याच्या लाडक्या वहिनीनं केला!
 मामाच्या घरी त्याची आबाळच झाली. नगरपरिषद शाळेचा सुमार दर्जा व बेताच्या बुद्धीमुळे कसाबसा पास श्रेणीस मॅट्रीक झाला. मग साधा बी. ए. व एका खाजगी कंपनीत पोट भरण्यापुरती नोकरी, माझीही परिस्थिती फारशी चांगली होती अशातली बाब नव्हती. पण ही घरच्याघरी शिलाईकाम करून हातभार लावीत होती. त्यामुळे अमितला पुढं शिकवणं पैशाअभावी शक्य नव्हतं. त्याची आम्हा दोघांनाही खंत होती. पण काही इलाजही नव्हता.

 आता अमित लग्नाचा झाला होता, पण त्याला फारशी स्थळं सांगून येत नव्हती. आणि जी एक-दोन आली ती त्याला व आम्हा दोघांना पसंत पडली नाहीत. मी व बायकोनं साच्या नातेवाईक - मित्र मंडळींना सांगून ठेवलं होतं व वारंवार पुन्हा पुन्हा आठवण देत होतो, पण स्थळं सांगून येण्याचं प्रमाण फारच कमी होतं. किंवा ते जवळपास नव्हतंच. त्यामुळे हिनं पुढाकार घेऊन शहरातील सर्व वधूवर सूचक मंडळात त्याचं नाव नोंदलं. पण मागील सहा महिन्यात मंडळांच्या संचालकांनी सचवूनही वधूपक्षाकडून काही प्रतिसाद येत नव्हता. मी 'रेशीमगाठी' मॅरेज ब्युरोत ब-याचदा गेलो होतो. त्यामुळे त्याचे संचालक उत्तम देगावकरांचा ब-यापैकी परिचय

२२६ । लक्षदीप