पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/225

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अधिकार होता व तो त्यानं वापरला.
 वर्षापूर्वी मीच मागे लागून औरंगाबादच्या रेशीमगाठी' वधूवर सूचक मेळाव्यात नीराची नोंदणी केली होती. त्यांच्यामार्फत सांगून आलेल्या मुलांची पण नकारघंटाच येत होती. “आज आपल्या नीरेच्या कांदा-पोह्यांची सेंचुरी होणार बघ." हे खिन्न स्वरात म्हणाले, “पाहू या, आज तरी कुण्या मुलाची विकेट पडते का?"
 दरवर्षी रेशीमगाठी' तर्फे भव्य प्रमाणात वार्षिक स्वरूपाचा वधूवर - परिचय मेळावा आयोजित केला जातो. इथं खूप स्थळे येतात. त्यामुळे आज आम्ही मोठ्या आशेनं जात होतो. इथं पाहातो तो काय, मुलींची संख्या जास्त व मुले तुलनेत कमी. त्यामुळे श्रीमंत मुलीच्या बापांनी मुलांना पटवल्यामुळे आमच्या वाट्याला सुमार स्थळे येत होती. नीराची सौंदर्याची जाणीव पराकोटीची होती, त्यामुळे तिची विद्ध नजर पाहाताना माझ्याही मनात कालवाकालव होत होती. काय एक एक ध्यान आमच्या वाट्याला येत होतं!
 एका स्थळाला नीरा पंसत पडतेय असं वाटलं. पण त्याचं कुरूप ओबडधोबड व्यक्तिमत्त्व, अधाशी भकेली नजर आणि त्याच्या एक डोळ्यात पडलेल्या फुलानं झालेली एकाक्ष नजर... त्याच्या बापानं सांगितलं, “पसंत आहे स्थळ. चला हॉटेलात जाऊ या, चहा-पोहे करीत पुढलं ठरवू या.' शंभरावे कांदे पोहे सार्थकी लागत होते. "तुम्ही साजेसं लग्न लावून द्या. आणि फार नाही - दहा हजार हुंडा द्या!"
 मी व नीरा एकमेकींकडे पाहात होतो. तिची विद्ध हताश नजर सारं काही सांगत होती. तिच्या वाट्याला नव-यामुलाची अधाशी भुकेली नजर पाहाता संसारात दररोज बलात्कारच वाट्याला येणार होता. तिची वेदना कळली व मी म्हणाले, 'अहो -'
 "जरा थांबा.” हे म्हणाले व नवच्या मुलाच्या बापाला म्हणाले, “आम्हांला मान्य आहे."
 “अहो पण -"
 "पुरे. काही बोलू नका. मी कुटुंबप्रमुख आहे निर्णय घ्यायला.”
 गावी परतल्यावर घरी हे म्हणाले, “मला कळतं, पण नाईलाज होता. पोरीचं वय वाढत चाललंय. दिवसेंदिवस कठीण होत चाललंय, मला मान्य आहे, नीरासाठी हे स्थळ अनुरूप नाही. पण किती वरसंशोधन करायचं? किती वहाणा झिजवायच्या?"
 नीरा खाली वाकली. ह्यांच्या चपला हातात घेत उभी राहिली. आणि कधीही वडिलांच्या नजरेला नजर न देता, खालमानेनं हळुवार बोलणारी माझी पोर त्यांच्याकडे पाहात किंचाळत म्हणाली,

 "माझं चुकलं - तुमच्या पोटी जन्म घेतला आणि लग्नासाठी तुम्हाला त्रास दिला. ह्या तुमच्या वहाणी - खरंच बाबा, खूप झिजल्या आहेत. माझ्यासाठी. माझ्या पायी. तुमचा हा निर्णय मला मान्य आहे. माझं त्या माणसाशी लग्न होत

लक्षदीप ॥ २२५