पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/227

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

झाला होता. ते स्वभावानं मोकळे होते. त्यांच्या पुढे मन मोकळं केलं, तेव्हा ते गंभीर होत म्हणाले, “तुमची समस्या खरी आहे. पण स्पष्ट बोलतो - राग मानू नका. पण अमित सर्वच बाबतीत कमी आहे स्थळ म्हणून."
 “त - तुम्हाला काय म्हणायचं आहे साहेब? मी - मी नाही समजलो."
 “ओ - कमॉन अर्जुनराव.” देगावकर म्हणाले, “ठीक आहे. मी सारे खुल्लमखुल्ला बोलतो. अहो, हल्ली मुली किती कमी झाल्यात. माझ्याच काय पण कुठल्याही वधूवर सूचक मंडळात जा, तिथं शंभर मुलांची स्थळे महिन्यात नोंदली जात असतील तर मुलींची जेमतेम पंचवीस-तीस. त्यामुळे मुलींना तुलनेने चॉइस आहे, जो दुर्दैवानं तुमच्या भावास - अमितला नाहीय. कारणही उघड आहे. बेताचं शिक्षण, जेमतेम नोकरी आणि साधं व्यक्तिमत्त्व!"
 मी त्यांच्या स्पष्टोक्तीनं मनस्वी घायाळ झालो होतो. पण कुठेतरी हेही लख्खपणे जाणवत होतं की, ते बोलतात ते काही चुकीचं नाही.
 प्रश्न असेल तर हाच होता की, सामान्य कुवतीच्या माणसांना संसाराचा अधिकार नाही?
 त्याचंही त्यांनी थेटपणे उत्तर दिलं, “आहे ना. पण आपणच त्या सोनोग्राफी तंत्रानं लिंगनिदान करून गर्भातल्या मुली मारत आहोत, त्यामुळे मुलींची संख्या कमी होतेय. १९९१, २००१ व २०११ च्या जनगणनेचे आकडे हेच कटू सत्य अधोरेखित करतात अर्जुनराव! त्यामुळे लग्नाच्या मार्केटमध्ये मुली कमी आहेत. आणि इथही बाजाराचं तत्त्वज्ञान लागू होतं - डिमांड अँड सप्लायचं. मुलींना, मुले जास्त असल्यामुळे, साहजिकच जास्त डिमांड आहे, पण सप्लाय कमी आहे. त्यामुळे त्यांना भाव आहे, चॉईस आहे -"
 आणि ते बराच वेळ या विषयाच्या अनुषंगानं बोलत राहिले. मी शांतपणे ऐकत होतो आणि मनोमन अस्वस्थ होत होतो. अमितच्या भवितव्याची व लग्नाची माझी चिंता मात्र शतपटीनं वाढली होती!
 आज रेशीमगाठी'चे वार्षिक वधूवर परिचय संमेलन होते. त्याला प्रमुख पाहुणे म्हणून पश्चिम महाराष्ट्राच्या एका जिल्ह्याचे कलेक्टर आले होते. त्यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यावर परिचय सोहळा संपन्न झाला. आमच्याकडे वधूपक्ष प्रथम फिरकलांच नाही. अमितचा चेहरा उतरला होता. त्याच्या पुरुषी अहंकाराच्या किती ठिकन्या होत असतील याची मला जाणीव होती, पण मी त्याला कसा दिलासा देणार होतो?

 मग उत्तम देगावकरांच्या सूचनेप्रमाणे आम्ही वधूपक्षाकडे गेलो. एक-दोन-तीनगरपाच. खरं तर या सर्व मुली अमितच्याही तलनेत डाव्या होत्या, अधिक सुमार होत्या. पण त्यांनाही देगावकर म्हणंल्याप्रमाणेच चॉईस होता. चांगले देखणे व अधिक पगारावरच्या मंडळींनी त्यांना आमच्या समक्ष मागणी घातली होती व ते अस्वस्थ

लक्षदीप ।। २२७