पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/204

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सर्वत्र स्त्री बरोबरीने वावरते आहे.
 मला हे आजवर कधीच कसं जाणवलं नाही? किती अविचारी पद्धतीनं मुलाचा आपण ध्यास घेतला. आपले आवडते राजकीय नेते पं. नेहरू व शरद पवारांना एकच मुलगी आहे. त्यांनाच त्यांनी राजकीय वारस म्हणून पुढे आणलं. इंदिरानं तर दिगंत किर्ती मिळवत बापाचं नाव किती तरी मोठं केले. सुप्रिया पण त्याच मार्गावर आहे.
 आणि आपल्या गावची सुवर्णकन्या तेजस्विनी सावंत! ती व तिच्या दोन बहिणींचा आई बापांनी अभिमान बाळगला. आज तेजस्विनीनं शूटिंगमध्ये जागतिक पराक्रम करीत वडिलांचं व घराण्याचे नाव किती उंच केलं!
 आपली व सरितेची बेबी पण अशीच नक्षत्रासारखी सुंदर झाली असती आणि आपलंही नाव तिनं रोशन केलं असतं!
 मी फार मोठा अपराध केला आहे. सरितेचा तर मी शतश: अपराधी आहे. मला त्याचे परिमार्जन केलं पाहिजे. या भयंकर अशा भ्रूणहत्येच्या अपराधाचे प्रायश्चित घेतलं पाहिजे!
 कसं? कसं?
 त्याच्या कंपनीच्या बॉसला मुलीचा वाढदिवसानिमित्त देणगी द्यायची होती. त्यांना इंटरनेटवर सर्च करताना या शहरातील ‘बालसंकुल' या अनाथ मुलांसाठी रिमांड होम व अॅडॉप्शन सेंटरची माहिती मिळाली. तेव्हा ते तिथं गणेशला घेऊन गेले व एक लाखाचा चेक संस्थेला देणगी दिली.
 त्यावेळी संस्थेची माहिती घेताना गणेशनं नवजात, टाकलेल्या बाळाच्या खोलीत एक छोटी दीड एक महिन्याची गोंडस मुलगी इनक्युबेटरमध्ये असलेली व स्वत:शी खेळताना पाहिली. आणि त्याच्या काळजात एक तीव्र कळ उमटली.
 आपली बेबी जन्मली असती तर कदाचित अशीच दिसली असती, आज एवढीच राहिली असती!
 त्याच्या मनात सरितेचे ते बोल घुमू लागले, “रक्तस्रावामुळे अपु-या दिवसांचा मी बाळंत झाले, त्यामुळे का तुम्ही तिला कमी वजनाची आहे म्हणून इनक्युबेटरमध्य ठेवली आहे? काही हरकत नाही. मला तिथं घेऊन चला. मला तिला भेटायचं आहे!"
 हा - हा देवीचा कौल आहे? दुसरा कौल? पहिला कौल आपण उधळून लावला. त्याची मी शिक्षा भोगतोय, माझी प्रिय पत्नी ही आज त्या आपल्या कृत्यामुळे जिवंत कलेवर झाली आहे. मुलीचा ध्यास घेत भ्रमिष्ट झाली आहे.
 मनात एक विचार चमकून गेला आणि स्वत:शीच तो समाधानाने हसला. यस.. मला असंच केलं पाहिजे!

 त्या दिवशी सकाळी सरिता झोपेतून जागी झाली, तेव्हा तिच्या कुशीत एक छोटी मुलगी खेळत होती. तिला बिलगत होती.

२०४ । लक्षदीप