पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/205

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "बेबी - माझी बेबी!” सरिता आनंदानं चीत्कारली, तिचे डोळे भरून आले. ते पुसत कुशीत खेळणारी ती छोटी मुलगी पाहू लागली.
 तिला तिनं आवेगात छातीशी धरलं, आणि त्याला हाक मारली. तो जवळच होता. त्याला पाहाताच ती म्हणाली, “असा गोड धक्का मला द्यायचा होता तर? केव्हा बरी झाली आपली बेबी! तिला इनक्युबेटर मधून केव्हा घरी आणली? आजच ना! मी मेली ठार झोपेत होते.... हे पहा ... मला खरंच पान्हा फुटतोय.”
 तो अवाक होऊन पाहात होता. मातृत्व एवढं प्रखर, सुंदर असतं? अगदी खरं आहे, स्त्री ही अनंत काळाची माताच असते, आणि मीही तसाच अनंत काळाचा पिता बनायचा प्रयत्न करीन!
 बाहेर येत तो बालसंकुलाच्या संचालकांना म्हणाला, “मी आभारी आहे. आपण किती लवकर व तत्परतेनं दत्तक विधान प्रक्रिया पूर्ण करून दिली! "
 पुन्हा काही वेळानं तो आत आला. सरिता बेबीला खेळवण्यात रंगून गेली होती. कसलं तरी बडबडगीत बोबड्या स्वरात म्हणत होती. तो त्या मातृत्वाच्या वात्सल्याच्या भिजून गेलेल्या बालगीतात रमून गेला.
 बेबीला त्यानं हातात घेतलं. तिच्या गोबच्या गुलाबी गालाचा हलकेच पापा घेतला व सरितेला म्हणाला, “हिचं नाव आपण माधुरी ठेवू या!”
 "ऐकलं का लबाडे? तुझे बाबा तुझं नाव माधुरी ठेवणार म्हणे?" आणि त्याच्याकडे पहात ती म्हणाली, “तिला व मला दोघांनाही माधुरी हे नाव पसंत आहे!"
 तो एकदम किंचाळला, “अग... अग, हे काय?"
 "माधुरीनं प्रसाद दिला वाटतं?" त्याचा ओला शर्ट पाहात सरिता खट्याळपणे म्हणाली, “आता खरेखुरे बाप झालात, हा, हा शकुन आहे बरं!"
 तो नुसताच समाधानानं हुंकारल्यासारखा हसला,
 आता दुस-यांदा मी तुम्हाला मुलगा, पुत्र देईन - प्रॉमिस!”

 “अं हं, आता मला माधुरी पाठोपाठ मधुबाला हवीय - मधुबाला!"

लक्षदीप । २०५।