पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/203

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जेव्हा अनावर झालेल्या सरिताने काळीज कापवणारा टाहो फोडाला, 'हो-हे काय झाले?
 तिचा हात रिकाम्या पोटावरून फिरताच ती पुन्हा आक्रंदन करीत म्हणाली, कुठे आहे माझं बाळ? कुठे आहे माझी बेबी?"
 डॉक्टरांकडे तिरस्काराची नजर टाकीत ती क्रुद्ध स्वरात म्हणाली, “तुम्ही-तुम्ही माझ्या बेबीला मारतात. तुम्ही खुनी आहात!”
 गणेशानं तिला सावरण्यासाठी तिच्या जवळ जात तिचा हात हाती घेत म्हणाला, “शांत हो राणी, शांत हो.."
 विजेचा झटका बसावा तसं सरितेनं त्याच्या हाताचा स्पर्श होताच तो झटकून टाकीत म्हटलं, “तुम्ही पण खुनी आहात माझ्या बाळाचे, दूर व्हा माझ्या नजरेसमोरून!”
 गेला पूर्ण महिना ती त्याला नजरेसमोर येऊ देत नव्हती. रात्रंदिवस आक्रंदत होती. डोळ्याला लागलेली अविरत धार, स्वत:ला एकटं काळोखात कोंडून घेणं. तिची ही अवस्था पाहात बाजूच्या गेस्टरूममध्ये तो अस्वस्थ, बैचेन होत तिची तडफड मनोमन झेलायचा आणि स्वत:च घायाळ व्हायचा.
 मग तिचा तोल जाऊ लागला. कसले भ्रम तिला होऊ लागले.
 अशाच एका भ्रमात चक्क तिनं त्याला बोलावून विचारलं, “माझी बेबी कुठंय? तिला दूर का ठेवलंय? मला दूध येत नाही म्हणून? पण मला एकदा तरी तिला भेटवा हो....!"
 तिचा हा भ्रम त्याला थोडा आश्वस्त करत गेला होता. आता या क्षणी ती त्याला खुनी-मारेकरी म्हणत नव्हती, तर लकडा लावीत होती की, माझी बेबी मला आणून द्या
 "रक्तस्रावामुळे अपु-या दिवसाची मी बाळंत झाले, त्यामुळे का बेबी कमी वजनाची जन्मली आणि तिला इनक्युबेटरमध्ये ठेवावी लागली? काही हरकत नाही. मला तिथं घेऊन चला.... एकदा तिला पाहू द्या हो."
 तिचा हा भ्रम बळावत होता. आता पुन्हा ती हिस्टेरिक होत चालली होती.
 गणेश एकटा असताना फाडफाड स्वत:च्याच मुस्काटात मारून घेत, स्वत:चा धिक्कार करायचा. थू तुझ्यावर! तू का माणूस आहेस? सैतान- खुनी आहेस. स्वत:च्याच गर्भाला मारलंस. ती मला कधीच माफ करणार नाही. माझा अपराध फार मोठा आहे. तिनंच काय, पण देवानंही माफ करू नये मला!'

 आता तो सर्वत्र उघड्या मनाने पाहू लागला, अरे, हे कधी आपल्या लक्षात आलं नाही की, आपली आई वडिलांपेक्षाही किती कर्तबगार आहे. आपली धाकटी बहिण भारतीय संघात क्रिकेटर आहे व मला तिचा भाऊ म्हणून ओळखतात - आता ती सैन्यदलात जायचं म्हणते. म्हणजे क्रीडा घ्या, घरगृहस्थी घ्या किंवा संरक्षण दल घ्या,

लक्षदीप । २०३