पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/192

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 मला तुम्हा दोघांच्या मृत्यूनं जीवनाकडे आजवर जे पाहाता आलं नाही, अशा वेगळ्या नजरेनं पहायला शिकवलं आहे. मदर, मी पपांच्या जीवनाचा सारांश ‘दि सटॅनिक हिरो' या कादंबरीच्या माध्यमातून शोधला. त्याचं पुनर्लेखन करून आणखी एकवार नव्या जाणिवेनं तो शोधायचा आहे. तसंच आता मला पुढील काळात तुझ्या जीवनाचा सारांश शोधायचा आहे. मला तू दिलेल्या शापवाणीमुळं आयुष्यभर मिळालेल्या असमाधानाच्या निमित्तानं.
 मदर, तू तरी अंतिम श्वास सोडताना समाधानी, कृतार्थ होतीस का गं? खरंच का तुला पपांवर तारुण्याच्या आवेगात तू केलेलं धुंद प्रेम, शरीरसुखात चिंब भिजलेलं ते दोन - तीन वर्षाचे उपभोगाचं व सहप्रवासाचं जीवन आणि माझा झालेला जन्म तुझ्या आध्यात्मिक जीवनातला अपघातच वाटत राहिला, शेवटपर्यंत? पपांपासून त्यानंतर तू खरंच पूर्णपणे अलिप्त व कोरडी झाली होतीस? का ‘ही - मॅन-' खराखुरा मर्द असलेल्या पपांची ओढ आणि धर्माची, पावित्र्याची प्रेरणा यातलं द्वंद्व तुला जाणवत होतं? फादर होण्यास दिलेला माझा नकार तुला एवढा क्रुद्ध कसा बनवून गेला की, मला तू आयुष्यभर असमाधानी राहण्याचा शाप दिलास? माझं तोंड तू आयुष्यभर पाहिलं नाहीस. तुझ्यात मातृत्व नक्कीच प्रखर होतं. कारण तू नर्सिगच्या माध्यमातून आजा-यांची शुश्रूषा आईप्रमाणं करीत होतीस. त्यांच्या जखमा धुताना क्रूसावरील येशूच्या जखमांवर लेप लावण्याचं समाधान त्यातून तू घेत होतीस. त्या माझ्या मेरी मदरला कधीच मला भेटावंसं वाटलं नाही, माफ करावंसं वाटलं नाही? मी व पपांनी जो जीवनप्रवास केला तो जाणून घ्यावासा वाटला नाही? चुकूनही कधी, क्षणभर का होईना त्यात सहभागी व्हावंसं वाटलं नाही? पपा व माझ्याविना चर्चच्या सेवेच्या दुनियेत तू खरंच का पूर्णपणे समाधानी होतीस?
 मदर, तुझ्या संदर्भात मला हे प्रश्न यापूर्वीही प्रसंगाप्रसंगानं पडले होते. आज या जगातून तू गेल्यानंतर ते एकत्रित, समुचितपणे जाणवत आहेत. मला या सा-यांचा वेध घेतला पाहिजे., त्यांची उत्तर शोधली पाहिजेत. त्यासाठी पुन्हा मला कोरे कागद आणि काळ्या शाईचं पेन हाती घेतलं पाहिजे. त्यातून एक कादंबरी निश्चित जन्माला येईल. 'दि सँक्रेड हिरॉईन!' येस, हे नाव मला चपखल वाटतंय. पपा ‘दि सटॅनिक हिरो', तर तू ‘दि सँक्रेड हिरॉईन!"

 पपांना मी ‘सैतानी नायक' म्हटलं असलं तरी त्यांच्यातील देवत्वाच्या छटाही मी कादंबरीत रेखाटल्या होत्या. आता मदर, तुझी ‘दि सँक्रेड हिरोईन' (पवित्र नायिका) चितारताना तुझ्यातलं सैतानत्व व काळीकरडी बाजूही मी तेवढ्याच सच्चेपणाने मांडीन... तू दिलेला शाप मला कसा विसरता येईल? बट आय प्रॉमिस यू मदर वनथिंग... मी तुला, तुझ्या जगण्यालाही न्याय देईन. मला चिंतन करून गवसलेले कलात्मक सत्यच मांडेन कादंबरीतून. तुला कदाचित ते रुचणार नाही. बट, आय काट

१९२