पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/191

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहेत, यंदाच्या साहित्याच्या नोबेल पारितोषिकासाठी माझं नाव अंतिम होण्याची शक्यता असल्याची आतील गोटाची बातमी आहे. पुलिट्झर, बुकर प्राईजनंतर आत सर्वोच्च नोबेल प्राईज मिळालं तर माझं जीवन शून्यवत कसं ठरेल? ते नाही मिळालं तरी आजवरचं लेखन व पुरस्कार हेही का कमी आहेत? नाही, माझं जीवन अगदीच काही वाया गेलेलं नाही. तरीही हातात ते काडतुसानं एक गोळी वगळता भरलेलं, ज्यानं पपांनी आपलं जीवन संपवलं होतं, ते पाच गोळ्या असलेलं पिस्तुल निरर्थक चाळा म्हणून खेळवताना विषाद का वाटतो आहे. अवघं जीवन प्रश्नांकित का होत आहे?
 पपांनादेखील अखेरच्या क्षणी अशीच विदारक शून्याची जाणीव झाली असेल? कदाचित त्यांना तेच सहन झालं नसावं. विचार करणं आणि निष्कर्ष काढणं हा त्यांचा स्वभाव नव्हता. सध्यासाध्या मनाचा कौल मानीत, मन मानेल तसं जगणं हा त्यांचा जीवनधर्म होता. जेव्हा तो त्यांना अर्थशून्य वाटू लागला, तेव्हा त्यांनी मागचा पुढचा विचार न करता आपलं जीवन संपवलं असावं.
 येस, येस! आता या क्षणी मला त्यांचा आत्महत्येचा अन्वयार्थ गवसतो आहे. पपांच्या जीवनावरच्या गाजलेल्या ‘दि सटॅनिक हिरो'ची नवीन आवृत्ती काढायची. ती केवळ रिप्रिंट न करता नव्यानं त्याचं पुनर्लेखन करून त्यांच्या शेवटाची कहाणी अलगपणे रेखाटली पाहिजे. नवा अनोखा व हृदयस्पर्शी शेवट केला पाहिजे. लेखनातला नवा प्रयोग.. नव्या आवृत्तीत मूळ शेवट तर ठेवायचा, पण हा नवाही शेवट सामील करायचा. वाचकांनी दोन्ही शेवट वाचून ‘दि सटॅनिक हिरो' च्या जीवनाचा कोणता अर्थ त्यांना भावतो, हे मला कळवावं असं आवाहन करायचं. जीवनाचा सारांश सांगणारे दोन अर्थ - दोन्हीही आपल्या परीनं सच्चे आणि कलात्मकही!
 मी अंतर्बाह्य थरारून गेलो होतो. एका नव्या कलात्मक सत्याच्या साक्षात्काराची व चिंतनाची अंधारगहा प्रकाशमान झाली होती. अंतरंग दिपवणा-या अनोख्या आनंदाचे ते रोमांच होते. असा रोमांचकारी अनुभव केवळ कलावंताच्या नशिबी असतो. त्याची धुंदी अनुभवताना मी विचारानं बेफाम व स्वैर झालो होतो...

 “मदर थेंक्स, थेंक्स अ लॉट! तू मला खरंच अनमोल अशी भेट दिली आहेस. ही पपांची निशाणी मला सदैव हे भान देत राहील की आपण जगतो, आपल्या जीवनाचा जो अर्थ सापडतो, तेवढंच जीवन नसतं! त्यापलीकडेही काही तरी हातात न येणारं, केवळ मनाला जाणवणारं असं काही अरूपासारखं, पण तेवढंच सत्य असं हा तरी असतं! त्यामुळे प्रत्येकाचा जीवनप्रवास अन् जीवनाचे तत्त्वज्ञान अपूरं म्हणन निसरडं वे फसवं असतं. जसा तो पपांचा जीवनप्रवास होता. मदर, तुझाही तसाच होता. नक्कीच असला पाहिजे. धर्म, पवित्र जीवन आणि त्या मार्गानं चालताना झालेलं जीवनदर्शन तरी कुठं अंतिम सत्य आहे? हेही मिथक आपणच नाही का निर्माण केलं?

लक्षदीप । १९१