पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/187

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असा वारसा आहे.. आणि हे तू काय असं विपरीत करीत आहेस? असं घाणेरडं लिखाण करण्यासाठी चर्चमधून पळून आलास? आय अॅम अशेम्ड ऑफ यू माय सन!”
 पण पपांमुळे माझ्यापुढे एक वेगळीच मर्दानगीची साहसी दुनिया साकारलेली होती. तसंच माझ्या अखंड जिज्ञासू कुतूहलामुळं, चौकस बुद्धीमुळे माझ्या नजरेसमोर एक वेगळंच विश्वास उलगडत होतं. त्या दुनियेत उघडे नागडे ऊग्र जगणं होतं, चोरीमारी होती, टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी देहविक्रय होता. स्त्रियांच्या देहाचा बाजार मांडून जगणारे दलाल, भडवे होते. गुन्हेगारी जीवन होतं व त्यांचंहीं आकर्षक असं एक तत्त्वज्ञान होतं. अमानुष, निघृण, मानवी जीवन क:पदार्थ मानणारं क्रौर्य व हिंसेचं ते जग होतं. त्यात मरणं, मारणं, स्वार्थ, निघृणता आणि उघडावागडा व्यापार होता. हेही जीवनाचं वास्तव रूप होतं. ते करडे व काळं होतं. हे सारं मला एक लेखक म्हणून एक्सायटिंग वाटत होतं, खुणावत होतं. तसंच याच्या जोडीला नागर जीवनापलीकडची नदी - सागर, अफाट जंगलं, पशुपक्षी आणि आजही आदिम जीवन जगणा-या आदिवासी माणसांची दुनिया होती. त्याचंही मला आकर्षण होतं. ही दोन विश्वं मला लेखक म्हणून आम्हान देत होती. ते शब्दबद्ध करायला प्रतिभा अक्षरश: मनात उसळी मारीत होती. एक अनोखं वादळी जीवन जगायचं आणि तेवढंच वेगळं, अस्सल ननैतिक असं लिखाण करायचं, हे माझं जीवनध्येय मला खुणावत होतं...
 मदर मला आई म्हणून कितीही आवडत असली तरी तिच्या कल्पनेप्रमाणं यापुढे मला जगणं केवळ अशक्य होतं. ते मी तिला धीटपणे स्पष्ट सांगून टाकलं, तेव्हा मदर हादरून गेली. त्याचे रूपांतर तीव्र संताप आणि त्याहीपेक्षा अधिक तीव्रतम स्फोटात झालं. तिनं मला चक्क शाप दिला.
 “तुला आयुष्यात कधीही समाधान लाभणार नाही. एका पापभीरू मातेचं हृदय तू तोडलं आहेस. यापुढं माझं आजन्म तोंड पाहू नकोस. आजपासून तू माझ्या लेखी अस्तित्वात नाहीस... जा, या घरात तुला स्थान नाही."
 त्या क्षणी मी घर, माझं गाव, परगणा सोडला. त्यानंतर आज चाळीस वर्षांनी परतलो होतो.

 मदरचा शाप खरा ठरला होता. आजवरच्या आयुष्यात मी सदैव अस्वस्थ, असमाधानी व बेचैनच होतो. माणूस म्हणून फार काही सोसावं, करावं लागलं होतं. पण एक लेखक म्हणून माझं हे असमाधान व ही अखंड बेचैनी माझ्यासाठी वरदानरूप सिद्ध झाली होती. त्यातूनच माझं विश्वविख्यात साहित्य साकारलं होतं. लेखनाचं ‘पुलिटझर' व 'बुकर प्राईज' ही पटकावलं होतं. नोबेल पारितोषिक खुणावत होतं. माझ्या बेचैन व अस्वस्थ जीवनाची सामग्री वापरून मी जे वेगळे लेखन केलं होतं,

लक्षदीप ॥ १८७