पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/186

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दिले, त्यानं मी केवळ अवाकच नाही तर हादरूनही गेलो होतो. माझ्या मनात तिच्याबद्दल मातृत्वाची जी कोमल व मंगल भावना काही प्रमाणात का होईना शिल्लक होती, ती त्याक्षणी संपून गेली. मुख्य म्हणजे तो माझ्या नास्तिक जीवनाच्या जन्माचा क्षण होता. ज्या धर्मापायी मदर आपल्या पोटच्या गोळ्याची भावना समजू शकत नाही, त्या धर्माचीच मला मनस्वी चीड आली. त्यानंतर मी कधीही धर्म वा ईश्वराला मानलं नाही. ख्रिस्ती म्हणून कोणतेच धर्मविधी, अगदी संडे प्रेअरही, केली नाही. एक वेगळंच बेहोश वादळी व निर्मितीक्षम लेखकीय जीवन जगलो. त्या जीवनात कधीही मला धर्म वा देवाची क्षणभरही आठवण झाली नव्हती. त्याची गरज भासली नव्हती. त्यानंतर आजच मी चर्चमध्ये मन हळुवार झाल्यामुळे आलो होतो. मदरच्या ऋणातून मुक्त होण्याचा हाच एक मार्ग होता, या जाणिवेनं असेल कदाचित!
 चर्चमधून पळून घरी आलो, तेव्हा माझी दुसरी कथा प्रसिद्ध झाली होती. पोस्टानं आलेला मासिकाचा अंक मदरच्या हातात पडला होता. ती कथा वाचून मदर संतापानं थरकापली होती. त्यामुळेच तिचा थयथयाट व शिव्याशाप एवढे प्रखर व आक्रस्ताळे झाले होते.
 माझी ही दुसरी कथा स्पेनमधील प्रसिद्ध अशा ‘बुलफाईट' या जीवघेण्या साहसी व रौद्र जीवनावर आधारित होती. मी त्या क्रौर्य व शौर्याच्या खेळाच्या बलदंडतेचं अमानुष तत्त्वज्ञान मांडलं होतं. नव्हे, पुरस्कारलेलं होतं. मदरची आता खात्री झाली होती की माझ्या अंतरात्म्याचा सैतानानं पुरता ताबा घेतला आहे. त्याची परिणती तिच्या आक्रस्ताळी प्रतिक्रियेत झाली होती. त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी हे मला त्या क्षणी उमगत नव्हतं.
 माझ्या पहिल्या दोन कथातली पात्रं व घटनाप्रसंग मी पपांच्या जीवनातून व त्यांच्या जगण्याच्या तत्त्वज्ञानातून कच्चा माल म्हणून उचलले होते. माझ्या प्रतिभेतून त्याला कथारूप दिलं होतं. पपांचं साहस, शौर्य, निरोगी हिंसा आणि मर्दानगीचं... ही मॅन' चं जगणं मला आपलं वाटायचं. कारण मी त्या दुनियेतला तगड़ा नौजवान मर्द होण्याच्या मार्गावर होतो.
 मदर मात्र चर्चच्या प्रभावानं व आध्यात्मिक प्रेरणेनं जगाचं शांतिमय व मंगल, करुणामय रूप पाहात होती.

 "माय सन, कसलं अघोरी पापमय हिंस्र जीवन कथेतून रेखाटतो आहेस?' ती मला तळमळून म्हणाली होती, “अरे बेटा, तो तूच आहेस का माझा लिटले स्वीट चाईल्ड? जो मी येशूचा हुंकार मानीत होते, मदर मेरीचा आशीर्वाद समजत होते. तुझ्यात मला एक संतपदाला पोचणारा फादर पाहायचा होता. माझ्या माहेरच्या घराण्यातले एक थोर पुरुष अठराव्या शतकात संतपदाला पोहोचले होते. पवित्र रोम शहरात त्यांच्या नावानं कॅथेड्रल बांधण्यात आलं आहे. तो आपला अभिमान बाळगावा

१८६ ॥ लक्षदीप