पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तीन वर्षाच्या राजकीय कार्यकाळाचे त्यातील घडमोडीचे वेगवान चित्रांकन या कादंबरीत आहे.
 ‘इन्किलाब विरुद्ध जिहाद' (२००४) ही लक्ष्मीकांत देशमुख यांची वेगळ्या विषयावरची कादंबरी.मराठीत दीर्घ अशा कालावकाशाचे चित्रण असणा-या कादंब-या फारशा नाहीत.वास्तविक कादंबरीसारख्या साहित्यप्रकारात मानवी जीवनाचे त्याच्या दीर्घ अशा कालावकाशाचे चित्रण करण्यास फार मोठा अवसर असतो.मात्र अशा दीर्घ पल्ल्याच्या कादंबच्या मराठीत फारशी नाहीत.'इन्किलाब विरुद्ध जिहाद' या जवळपास साडेनऊशे पृष्ठांच्या कादंबरीत प्रदीर्घ अशा अफगाणिस्थानमधील धर्मयुद्धाचे चित्रण आले आहे.अफगाणिस्थानमधील विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील अर्धशतकाचा पट तीमधून चित्रित झाला आहे.भारतालगत वसलेल्या अफगाणिस्थानातील पन्नास वर्षाची राजकीय वाटचाल या कादंबरीत आहे.विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ज्या आंतरराष्ट्रीय दहशतवादाने अधिक भयावह रूप धारण केले आहे त्या वास्तवाचे मराठी कादंबरीत प्रथमत:च आंतरराष्ट्रीय राजकारणाचे,तेथील सत्तासंघर्षाचे,बदलत्या समाजजीवनाचे व राजकारणाचे चित्र अभिव्यक्त झाले आहे.
 कादंबरीतला प्रमुख संघर्ष आहे तो क्रांती विरुद्ध धर्मयुद्ध यांच्यातील.विशिष्ट प्रदेशातील सामूहिक मनाला व जीवनरीतीला विशिष्ट आकार प्राप्त झालेले असतात.अफगाणिस्थानात समूहजीवनावर व संस्कृतीवर धर्मभावनेचा मोठा प्रभाव आहे.आधुनिकीकरणाच्या एका टप्प्यावर अफगाणमधील बदलाला सामोरे जाताना मुळातल्या जिहादचा उद्रेक होतो आणि वणव्याप्रमाणे तो सर्वत्र पसरतो.या राष्ट्राचा काही काळ सोव्हियत युनियनशी संबंध येतो आणि मार्क्सवादी आधुनिकतावादी राजकीय विचारसरणीशी अफगाणमधील लोकांचा संबंध येतो.ही विचारसरणी रुजताना मूळच्या परंपरेतील मूळ आकारांना तडे बसतात.ते दुभंग होतात.मात्र चिवट अशा धर्मप्रेरणेमुळे ही सर्व माणसे धर्मसंस्काराला जवळ करतात व जिहादच्या वाटेने राज्यसंस्थेला आपलेसे करतात.
 या कादंबरीतील जीवनचित्रणास बदलत्या आंतरराष्ट्रीय राजकारणाचा संदर्भ आहे. अफगाणिस्थानातील समूहदर्शन आहे.संस्कृतिचित्रण आहे.कौटुंबिक स्थितीची वर्णने आहेत. लोभस आणि मोहक निसर्ग आहे.परंपरा आणि आधुनिकता यातील संघर्ष आहे.स्त्रियांच्या हालाखीच्या दु:खभन्या करुण कहाण्या आहेत.

 या प्रकारच्या जीवनचित्रणासाठी देशमुख यांनी अनेकविध पात्रांची निर्मिती केली आहे.मुस्लीम पुश्तू कुटुंबातील समाजदर्शन तीमध्ये आहे.एकाच वेळी वास्तव आणि कल्पित यांच्यातील बेमालूम मिश्रण या कादंबरीत आहे.ही कादंबरी त्यांनी मोठ्या कष्टपूर्वक व व्यासंगपूर्वक रीतीने लिहिली आहे.विशेषत: दहशतवादासारख्या संवेदनशील विषयावर लिहिणे ही अवघड अशी बाब असते आणि तो विषय जबाबदारीच्या

लक्षदीप ॥ १७