पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गाडीत त्याची पूर्वीची आई असणे,तिच्यातला वात्सल्यभाव जागृत होणे आणि त्याचे तिला परतवून लावणे अशा अनेक योगायोगाच्या घटना कादंबरीत घडतात.तसेच कादंबरीतील घटना,प्रसंगांना फार वेग आहे,गती आहे.या कादंबरीत घटना-प्रसंगातील धावती दृश्यमिती मोठ्या प्रमाणात आहे.एकूणच भ्रष्टाचाररूपी प्रशासनातील व्यवस्थेचा पट या कादंबरीतून साकार झाला आहे.तडजोडवादी भ्रष्ट व्यवस्थेचा विजय यात होतो.भ्रष्टाचाररूपी किडलेल्या व्यवस्थेला शरणागती पत्करणाच्या समूहजाणिवेचा आविष्कार या कादंबरीत आहे.तसेच आनंद पाटलाच्या कृतीतून नव्या पर्यायाचा शोधही आहे.
 ‘अंधेरनगरी' (१९९४) ही त्यांची दुसरी कादंबरी.राजकारण व प्रशासनातील एका वेगळ्या पैलूवर प्रकाश टाकणारी ही कादंबरी आहे.नगरपालिकेच्या सत्ताकेंद्राच्या प्राप्तीचा संघर्ष या कादंबरीत आहे.सर्वत-हेच्या कपटनीतीचा अवलंब सत्तासोपानासाठी कसा केला जातो त्याचे तीव्रतर चित्रण या कादंबरीत आहे.राजकारणातील सूक्ष्म तपशीलातून सत्तासंघर्षाचे विश्व या कादंबरीतून साकार झाले आहे.
 स्वातंत्र्यानंतरच्या तीनेक दशकात जे ध्येयवादाचे,साधनशुचितेचे राजकारण,समाजकारण धुळीला मिळाले आहे.त्याची जागा आता केवळ स्वार्थप्रेरित राजकारणाने घेतली आहे.कादंबरीची सबंध सूत्र हे नगराध्यक्षपदाच्या सत्ताकेंद्रावर खिळलेले आहे.त्याच्या भोवतीचे विविध सूत्रे समांतरपणे व्यक्त होतात.मात्र अंतिमतः ते सत्तेच्या खुर्चीभोवती पिंगा घालून तिथेच विराम पावतात.सत्ताप्राप्तीसाठी साम,दाम,दंड, भेद या नीतीचा अवलंब केला जातो.उद्या पुन्हा हाच खेळ याप्रमाणे पुन्हा एकदा राजकारणाचा नवा खेळ आकाराला येतो.त्या कपटनीतीच्या अंधेरनगरीचा शोध या कादंबरीत आहे.नगरपालिकेतील सत्तासंघर्षाला किती विविध तहेचे कंगोरे असतात याची प्रचिती या कथनसूत्रात आहे.राजकीय गणिते,समाजकारण, जातकारण,प्रदेश अस्मिता ते सूडनाट्याची व्यूहरचना या कादंबरीत आहेत.वरवर हा लालाणी व पाटील यांच्यातील सत्तासंघर्ष दिसत असला तरी यामध्ये अनेक घटक सक्रीय असतात.समान हितसंबंधाचे धागे गुंतलेले असतात.सत्ताप्राप्तीच्या आंतरिक वास्तवाचा वेध या कादंबरीत आहे.

 Everything is fair in love, war and politics या विचारसूत्राचा आविष्कार या कादबरीत आहे.राजकारण माणसाला निघृण व कठोर बनविते या जाणिवेचा आविष्कार कादंबरीतून घडला आहे.या कादंबरीचा लक्षणीय विशेष म्हणजे नगराध्यक्षपदाचे सत्तापद केंद्रस्थानी ठेवून त्याच्या प्राप्तीचे राज्यकर्त्यांमध्ये चाललेले विविध मार्ग ध्वनित झाले आहेत.राजकीय जाणिवांचे फार बारकाईचे संदर्भ या कादंबरीत आहेत.यासाठी अनेक पात्रांची निर्मिती केली आहे.ही पात्रे या सत्तासंघर्ष नाट्यात विविध भूमिका बजावतात.सहभागी होतात.राजकीय चर्चित विश्वाचा भाग त्यामध्ये आहे.

१६ । लक्षदीप