पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/175

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 डॉक्टरांच्या 'शॉकथेरपी'ने आणि मनमोकळ्या गप्पानं कमल महिनाभरातच खडखडीत बरी झाली. या दोघांच्या गप्पांच्या सिटिंग सेशनमध्ये संदीपभय्या पण रस घेऊन सामील होत होता. डॉक्टरांनी त्याला क्लू दिला होता की, तिचं मन कणखर व्हायला पाहिजे व ती जरी अनाथ आश्रमातून आलेली असली तरी तिचं स्वत:चं हक्काचे घरकुल आहे व यात तिला काही दोष नाही हे पटवून देता आलं पाहिजे.....
 संदीपला तिची संगीत व कवितेची आवड माहीत होती, पण तो पडला इंजिनिअरिंगचा विद्यार्थी, पण तिच्या मनाला उभारी मिळावी म्हणून साहित्याचे वाचन करून तिच्याशी गप्पा मारीत तिला रिझवायचा प्रयत्न करू लागला. तिच्याबरोबर संगीताच्या मैफलीला कळत नसूनही जाऊ लागला व तिला समजून घेण्याचा प्रयत्न करू लागला आणि अचानक त्याला एक जादूचा मंत्र सापडला. त्याचा अचूक वापर करीत कमलला सत्य सहजतेनं स्वत:ला दूषण न देता स्वीकारायला त्यानं भाग पाडलं.
 “कमल, तू नारायण सुर्वेच्या कविता वाच, हा युगप्रवर्तक असा कामगार कवी. पण त्याच्या वडिलांना, म्हणजे गंगारामांना, तो फूटपाथवर सापडला. पण त्याचा त्यांनी किती सहजतेने स्वीकार केला. आजही ते उघडपणे व जाहीरपणे सांगतात व स्वत:ला ‘सूर्यकुलातील लोक म्हणवून घेत कवितेतून म्हणतात
 "मी लिहितो दारावर मांगल्यासाठी शेवटचा उच्चार
 सूर्यकुलातील लोकांना थांबणे माहिती नाही.
 त्याखाली कशासाठी हवे नाव: निनावे म्हणतील म्हणून
 आपल्या हाताचे ठसे पुरेसे का नाहीत?”
 "कमल, तुझं नातं असलंच तर त्या प्रतिभावंत कवीच्या कलासाधनेशी, जीवनसाधनेशी आहे. पुन्हा सुव्र्यांना जसे प्रेमळ वडील भेटले, तुलाही हे आपलं घरकुल आहे व बिलिव्ह मी- आम्हा तिघांच्याही जगण्याचा केंद्रबिंदू तू आहेस. मला तर असं क्षणभरही वाटत नाही, तू माझी सख्खी बहीण नाहीस. खरं नातं हे मनाचं, प्रेमाचं व परस्पर ओढीचं असतं, ते रक्ताचं असलंच पाहिजे अशी काही अट नाही...." आणि खरंच कमल बदलली. नारायण सुर्त्यांचे जीवन व कविता वाचून तिला तिचा ‘इरॉस' गवसला होता.

 कात टाकून जसा नाग पुन्हा लसलसलेला जीवनगामी होतो, तशी कमल पण समरसून जीवनाचा क्षणन् क्षण उत्कटतेने जगू लागली. तिचं काव्यलेखन पुन्हा बहरून आलं, संगीतसाधना अधिक प्रखर बनली आणि झी. टी. व्ही. च्या अंताक्षरी कार्यक्रमात व ‘सारेगम' कार्यक्रमातून ती एकाच आठवड्यात चार दिवसांच्या अंतराने सर्वप्रथम आली आणि तिला श्रीकांतनं मागणी घातली आपणहून, तिचं छोट्या पडद्यावरचं मोहक रूप व तेवढाच आकर्षक आवाज ऐकून, पाहून. बाबांनी धूमधडाक्यात

लक्षदीप । १७५