पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/173

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होतं. ती कामापुरतंच, तेही शक्यतो खुणांच्या भाषेत बोलायची. आपल्या खोलीमध्ये पलंगावर स्वस्थपणे आढ्याकडे नजर लावून राहायची. या उदास मनोवृत्तीला जोड मिळाली ती चिड़चिडपणाची. तिची समजूत घालण्यासाठी तिघांपैकी कुणी आलं की, प्रथम ती सरळ दुर्लक्ष करायची, नाही तर ती नाराजी व्यक्त करीत बेफाम होत बोलायची. तिची जेवणावरची वासनाही उडाली होती व झपाट्याने तिचं वजन उतरत होतं. कमळासारखा चेहरा सुकून काळवंडला होता. साध्या चालण्याच्या क्रियेनंही तिला थकवा जाणवत होता.
 तिला आपलं हे वागणं बरोबर नाही, त्याचा पूर्ण घराला त्रास होतोय हे समजत होतं. पण बाबांनी केलेला गौप्यस्फोट तिला समूळ हादरवून गेला होता. आपण कुणाच्या तरी पापाचे, अवांछित कामवासनेचे फळ आहोत, आपल्या जन्मदात्री आईसाठी आपण जन्माच्या वेळी कलंकरूप ठरलो होतो. म्हणून उकिरड्यावर तिनं टाकलं. पोलिसांनी मग अनाथ आश्रमात दाखल केलं. पण आई-बाबांना आपण आवडलोत व हे घर मिळालं.. आजवर किती उबदार व लोभस विश्व होतं आपलं. पण त्या गौप्यस्फोटाने एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. आईचा वत्सल आश्वस्त स्पर्श तोच होता. पण कमललाच तिच्या जागी रंगरूप नसलेली एक स्त्री दिसायची. बाबांचं लक्ष व मायेची पाखर तशीच होती, उलट ती कदाचित अपराधी भावनेच्या टोचणीमुळे वाढली होती, पण तिला तेथे अज्ञात पिता- जो तिच्या आईचा प्रेमी होता, की बलात्कारी होता देव जाणे, जाणवायचा आणि ती ताठर व्हायची, आक्रसून जायची. संदीपभय्याचा स्पर्शही तिला वेगळी जाणीव द्यायचा. त्याचं आपलं रक्ताचं नातं नाही...
 तिच्या विचारांना व बुद्धीला पटायचं की, जन्म दिल्यानं कोणी आईबाप होत नाही. खस्ता खाऊन रात्र रात्र जागवीत ममतेनं संगोपन करता करता ते नातं जुळून येतं, तसं आपलं आहे. ते ख-याहून खरे माता - पिता व भाऊ आहेत.

 तरीही मनाला ते भिडत नव्हतं. रक्ताची ओढ त्यात नाहीय, असं वाटत होतं ते खरं नाहीय, परवा संदीपभय्याला स्कूटरचा छोटासाच अॅक्सिडेंट झाला, तेव्हा आपणही किती कळवळलो होतो. ही काळजी व ओढ आपलं नातं नाही सिद्ध करीत? आईच्या पायावर ऊनऊन पाण्याचा तांब्या निसटून कातडी भाजून निघाली तेव्हा मलमासोबत आपण आपल्या डोळ्यातील अश्रूचा व मनातील काळजीचा लेप लावला होता. तेव्हा तिचं आपलं मायलेकीचं नातं नाही का अधोरेखित झालं? बाबा काही कामासाठी मुंबईला गेले होते, तेव्हा तुफानी पावसानं ते ट्रेन वाटेतच थांबल्यामळे अडकून पडले होते. सुदैवाने जवळच मोबाईल फोन होता, त्यावरून त्यांनी निरोप दिला. तरीही आई ते येईपर्यंत डोळ्यात प्राण आणून वाट पाहत होती. तिच्या व्याकुळतेत आपणही सामील होत रात्रभर झोपलो नाही व जेव्हा बाबा थकूनभागून

लक्षदीप । १७३