पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आशयसूत्र अभिव्यक्त झाले आहे.कादंबरीत या दोन अनुभवसूत्रांच्या ताणांतून त्यास आकार प्राप्त झाला आहे.लेखकाने या कादंबरी रचितामध्ये एक मुख्य विचारसूत्र गृहीत धरलेले आहे.गेल्या तीस चाळीस वर्षात प्रशासनात भ्रष्टाचाराने प्रचंड थैमान घातले आहे.भ्रष्टाचारानं चहूबाजू व्यापणे हे लोकशाही कल्याणकारी व्यवस्थेला बाधा आणते आहे.संवेदनशील अधिका-यांची या व्यवस्थेत प्रचंड घुसमट होते आहे.या कादंबरी शीर्षकात ‘ऑक्टोपस' हे एक रूपक योजिले आहे.ऑक्टोपस - समुद्रजीवांचे भक्ष्य सापडताच तो त्याला चहूबाजूंनी वेढून टाकते.ऑक्टोपस बाह्यरूपाने नाजूक आणि मृदू दिसतो.मात्र आपले भक्ष्य पायांनी पकडून तो त्या जीवाला गिळंकृत करतो.तद्वत भ्रष्टाचारात गुंतलेल्यांना भ्रष्टाचाराचे हे जग वरून मोहक वाटते.मात्र आतून त्याची सर्वव्यापक गिळकुंतता लक्षात येत नाही.तसेच या भ्रष्टाचाररूपी ऑक्टोपसने भारतीय समाजाला चहूबाजूने वेढून टाकले आहे.या मूल्यभानाचा आविष्कार ही कादंबरी करते.
 या विचारसूत्राचा आविष्कार करण्यासाठी लेखकाने प्रशासनातले हे जग सरळ दोन रंगात न्याहाळले आहे.आपल्या म्हणण्याच्या प्रतिपादनासाठी काळ्या आणि पांढ-या रंगात त्या जगाची निर्मिती केली आहे.कादंबरी संरचनेतील कथासृष्टीपासून ते पात्रे,घटना,प्रसंग यावर निवेदकाने कल्पिलेल्या मूल्यभावाचा गडद प्रभाव आहे.एका आदर्शवादी भूमिकेतून या सा-या कथासृष्टीकडे पाहिले गेले आहे.या आदर्शवादी भूमिकेचा वारंवार उच्चार कादंबरीभर आहे.उपभोगतावादी मूल्य-हासाच्या राजकारणाची व प्रशासनातील संगनमताच्या जुटीची ही कहाणी आहे.आजच्या भ्रष्टाचारी काळाचा युगधर्मच यातून सांगितला गेला आहे.या कादंबरीत या भ्रष्टाचारी जगाच्या चित्रणांबरोबर कुटुंबजीवनातील व प्रशासनातील अनेक ताण आहेत.तरुण मुलांच्या शिक्षणाचे व त्यांच्या करिअरचे जग आहे.यात तडजोडवादी भूमिकांचे चित्रण आहे.भगवान काकडे आपल्या मुलाच्या वैद्यकीय शिक्षणासाठी व त्यासाठी द्याव्या लागणाच्या डोनेशनसाठी तो पालकमंत्र्याशी तडजोड करतो. नोकरीत गैरमार्गाने मिळणाच्या पैशाची जागा पत्करतो.

 सिनेमॅटिक वर्णनाच्या अंगाने या कादंबरीचे रूप घडले आहे.विशेषत: भगवान काकडेची कथा ही या कादंबरीत महत्त्वाचा संदर्भबिंदू आहे.त्याच्या या काळातील आयुष्यक्रमात ज्या घटना घडतात त्या योगायोगाच्या व आकस्मिक नाट्य निर्माण करणाच्या आहेत.त्याची पत्नी भ्रष्टाचाराचा आरोप आल्यामुळे भगवान काकडेला सोडून निघून जाते.तेही ज्याने भगवानला या प्रकरणात गुंतवले त्याच्याकडे.तो उस्मानाबादला येतो त्यावेळी त्याला आधार देते ती रुक्मी.त्याच्या गावातीलच आयुष्यातील दुर्दैवी घटनेमुळे वेश्या म्हणून जगत असलेली.भगवानचा मुलगा आनंद हुशार,दहावीला पहिला नंबर आलेला.रस्त्यात एका गाडीकडून त्याला अपघात.

लक्षदीप ॥ १५