पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/163

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

झाल्याप्रमाणे! का? कळत नाही, पण काही विचारायचं आहे. विचारू? परवानगी आहे?”
 मोरया गोसावी मंदपणे हसला. ती त्याची संमती समजून अक्षयनं विचारलं, महाराज, आजवर कधी मी अध्यात्माचा विचार केला नाही; पण इथं आल्यावर, तामुलवाडीकरांचं निसर्गाच्या लहरीवर, म्हणजेच पर्यायानं नियतीवर, अवलंबून असलेलं परावलंबी व कुंठित जीवन पाहिलं की वाटतं, त्यांना जगण्या-मरण्यासाठी धर्म-श्रद्धा नामक अफूची गोळी, इथं तंबाखू अमाप पिकतो, म्हणून तंबाखूची गोळी म्हणावी लागेल, त्याची फार गरज आहे. तुम्ही संन्यासी आहात. कदाचित वेदशास्त्रसंपन्न दर्शनकार असाल. तुम्ही याची कशी मीमांसा कराल? या नियतीच्या संकेतामागच्या ईश्वरी इच्छेचा कशा पद्धतीने अर्थ लावाल?”
 कदाचित मोरया गोसावीला अक्षयकडून अशा कूटप्रश्नाची अपेक्षा नसावी. त्याच्या नजरेतलं ते वत्सल स्मित काहीसं झाकोळलं गेलंय, असं अक्षयला वाटलं!
 "आज तुमच्या संगतीनं एक मरण पाहिलं व जीवनाची प्रतिभा, नव्या जीवनाच्या जगप्रवेशाची नांदी-मातेच्या वेणेतून अनुभवली. तुम्ही काय केलं? त्या मरत्या जिवाला वाचवू शकला नाहीत की येणा-या जिवाला आणू शकणार आहात? केवळ वैद्यकीय मदतीचा अभाव हे त्या दोन घरांच्या जीवन-मरणाच्या वेदनेचं कारण आहे."
 “ती-ती त्यांची नियतीच म्हणावी लागेल. कदाचित गावाची पण!" मोरया गोसावीचा स्वर त्याला बचावात्मक व पोकळ वाटत होता. "माझं दर्शनशास्त्र असं सांगतं की, जन्म-मरण असं काही नसतं. कारण आत्मा अमर असतो. तो वस्त्रांप्रमाणे शरीर बदलतो..."
 “ते एक वेळ मान्य करता येईल. कारण एक हिंदू म्हणून माझ्यावरही तेच संस्कार आहेत." अक्षय म्हणाला, “पण तो जन्मास आला आहे तुमच्या कर्म विपाकाच्या सिद्धान्तानुसार. त्याला या जगात किमान भौतिक सुख - सुविधा मिळाली पाहिजे. ती त्याला मिळत नाही, कारण आम्ही प्रशासक व आमच्यावर अधिकार गाजवणारे राज्यकर्ते नालायक आहेत. इथं नियतीचा काय संबंध?"
 "तुमचं - तुमचं नातकर्तेपण व त्यामुळे त्यांचं पुराशी व पर्यायाने मृत्यूशी बांधलं गेलेलं जीवन हीच ती नियती आहे बेटा!”
 "हा- हा जबाबदारी झटकण्याचा, रणांगणातून पळ काढण्याचा मार्ग झाला महाराज. मला तो खरंच तकला व बुद्धीला पटत नाही.' अक्षय आवेगानं म्हणाला, मनाला तुमची शिवस्तुती व मंत्रोच्चाराच्या नादच्या प्रभावानं एक अज्ञातसा दिलासा मिळतो, पण तो तर्काच्या कसोटीवर टिकत नाही."

 बेटा, हा तुझ्या अध्यात्माच्या, एका अज्ञात वाटेवरील शोधयात्रेचा आरंभबिंदू आहे. मोरया गोसावी म्हणाला, “आपल्या प्रश्नांची उत्तरं आपणच शोधायची असतात. त्यासाठीचं शास्त्र म्हणजे अध्यात्म आहे, बेटा, तू आज त्या वाटेवर

लक्षदीप । १६३