पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/141

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

केल्याचं काही वृत्तपत्रात आलं नाही. त्यांना का एक अख्खी परीक्षा मुलाखतीनंतर रद्द झाल्याची झळ पोहोचली नव्हती? दोन वर्षांच्या त्यानंतरच्या परीक्षांचे निकालही जाहीर न केल्यामुळे त्यांचा नाही जीव अधांतरी टांगला गेला होता? मग त्या सा-यांच्या भवितव्याशी खेळ खेळणा-या नराधमाला आपण तिघांनी तोंडाला काळे फासून त्यांच्या अस्वस्थतेला वाट दिली आणि जेल पत्करला. पण त्यांना त्याचं काहीच कसं वाटत नाही?"
 का? का? पुन्हा त्याच छद्मी, टोकदार मनाचं घायाळ करणारं विश्लेषण, ते अजूनही सहनशील आहेत. त्यांना अजूनही आशा आहे. त्यांना सनदी अधिकारी व्हायचं आहे. आपल्या नावावर गुन्हा नोंद करून घ्यायचा नाहीय आपल्यासारखं! कारण उद्या सिलेक्शन झालं तर पोलीस दप्तरी गुन्हा दाखल झाला असता तर नावावर काट मारली गेली असती!
 ....आणि नेहाचं मन तिला टोचणी देऊ लागायचं. “का असा मूर्खपणा केलास? काय मिळवलं त्यातून? तो नराधम तसाही जेलबंद आहेच. प्रयत्न करूनही, नामवंत क्रिमिनल वकील देऊनही कोर्टानं त्याला बेल नाकारलीय. तो सडतोच आहे. जेलमध्ये! कोर्टातून बाहेर येताना पत्रकारांना उत्तर देताना त्यानं दाखवलेला निर्वावलेपणा व पश्चात्तापाची यत्किंचितही जाणीव नसलेला त्याचा हसरा चेहरा पाहून आपला उद्रेक झाला आणि कोर्टाच्या आवारातच पावसामुळे झालेला चिखल त्यांच्या तोंडाला फासला आणि तोंड काळं केलं."
 मी-मी काहीच चूक केली नाही. त्यामुळे झालेला गुन्हा आपल्या करिअरच्या आड येणार नाही.
 पण भांगेत तुळस असावी तसे एम. पी. एस. सी. च्या दलदलीत त्या सान्यांपासून अलिप्त राहणारे सूर्यवंशी सर, ज्यांच्या ज्ञानोदयात आपण शिकलो व त्यांच्या आदर्शानं संस्कारित झालो, ते त्यावेळी किती कळवळून म्हणाले होते,
 “पोरांनो, तुम्ही या कृत्यानं आपल्या पायावर धोंडा पाडून घेतलात. अरे, मी आणीबाणीत विद्यार्थी नेता म्हणून निदर्शनं केली व जेलमध्ये गेलो. त्यानंतर एम. पी. एस. सी. परीक्षेत टॉपर राहनही नोकरी मिळाली नाही. अन्यथा, आज कलेक्टर झालो असतो. मी इथं होतो ना. सारं काही साफ करायच्या मार्गावर होतो, पण तुम्ही हे काय करून बसलात?”
 आणीबाणीनंतर सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता नसल्यामुळे सरांनी लेक्चररशिप पत्करली. पुढे प्राध्यापक झाले. नंतर प्राचार्य. आता एम. पी. एस. सी. चे सदस्य कदाचित उद्या चेअरमन होतील. सारं काही साफ करतील. रखडलेले दोन्ही वर्षाचे निकालही लागतील.

 पण आपले स्पर्धा परीक्षेचे मार्ग बंद झाले आहेत. आपलं सनदी अधिका-याचं

लक्षदीप ॥ १४१