पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/140

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 सालं जगणंही आता ओझं वाटतंय! कोठडीतल्या नि:सत्त्व अन्नानं शरीर खंगल्यासारखं वाटतंय. पण त्याच्या कितीतरी अधिक पटीनं मन खंगलंय. खचलंय. एक प्रकारची बधीरता येत चाललीय.
 म्हटलं तर हे सिद्धार्थचं स्वगत होतं. स्वत:शीच पुटपुटणं होतं. म्हटलं तर नामदेवाला उद्देशून केलेलं मनाच्या घालमेलीचं प्रगटीकरण होतं.
 हा त्याच्या, माझ्या, आपल्या आजच्या अख्ख्या पिढीचा, एम. पी. एस. सी. च्या माध्यमातून चांगलं करिअर करू पाहणाच्या काही लाख तरुणांच्या अस्वस्थतेचा, वैतागाचा आणि संतापाचा तो उत्स्फूर्त व आक्रमक उद्रेक होता. ज्वालामुखीच्या उकळत्या रसासारखा तप्त!
 सिद्धार्थ बोलूनचालून भाषाप्रभू, किंचित कवी. मराठी साहित्याचा एन्सायक्लोपिडिया म्हणावा एवढा भाषातज्ज्ञ. नामदेव अर्थशास्त्रामधला किडा, दोघांनी एम. पी. एस. सी. परीक्षा दोन वेळा दिलेल्या. दोघांचेही पेपर छान गेलेले, पण....
 आता सारं काही संपलेलं. तीन रात्री पोलीस कोठडीत जागत मन स्वत:लाच विचारीत होतं... आता पुढे काय?
 एक भलं मोठं, कधीच न संपणारं कृष्णविवर..!!
 स्पर्धा परीक्षेसाठी विज्ञान घटकाचा अभ्यास केल्यामुळे नामदेवला कृष्णविवर आठवलं. त्याच्या, सिद्धार्थच्या व नेहाच्या उद्याच्या बेकार, शिवाय त्या कृत्यानं शिक्का बसलेल्या गुन्हेगाराच्या जीवनाचं प्रतीक!
 ....आणि आज सकाळी पोलीस सांगत येतात, “चला, तुमची बेल झालीय! कुणी व का केली? कशासाठी?
 असाच निरोप नेहाला. “तुझा व तुझ्या त्या दोन साथीदारांचा जामीन झाला आहे. चल कार्यालयात!”
 पोलीस कोठडीतल्या तीन रात्री ती स्वत:ला निक्षून बजावत होती, “नाही बये, तुला धीर सोडून चालणार नाही. तू बिलकूल काही गुन्हा केला नाहीस. त्या नराधमाला खरं तर फटके मारले पाहिजे होते वेताचे. त्या मानानं केवळ तोंडाला काळे फासणं फारच सौम्य शिक्षा आहे. तू गुन्हेगार नाहीस."

 पण आपलंच छिद्रान्वेषी मन टोकत होतं, “मारे मोठ्या थाटात दोस्तांसह त्या माजी कुलगुरूंच्या तोंडाला काळे फासलंस! आव तर होता, साच्या परीक्षार्थी बेरोजगार तरुणांच्या संतापाचा तो उद्रेक होता. आज अख्ख्या महाराष्ट्रात दोन ते तीन लाख तरुण - तरुणी एम. पी. एस. सी. परीक्षेचे स्वप्न पाहात आयुष्यातली तीन-तीन, चार-चार, तर कधी पाच-दहा वर्षही, रात्रीचा दिवस करीत अभ्यास करीत आहेत. त्यांनी काय केलं? तम्हा पराक्रमी त्रिकुटाच्या समर्थनार्थ काही मोर्चे काढल्याचं, उपोषणं वगर

१४० । लक्षदीप