पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सामाजिक नियमनात स्त्री अंतिमत: बळी पडते.तिच्या शारीर व मानसिक बळी पडण्याचे संवेदन या कादंबरीत आहे.अन्वर बरोबर अनिच्छेनेच सलोमीला लग्न करावे लागते.त्याच्याकडून तिचा छळ होतो आणि तिला तलाकही दिला जातो.पुढे ती काही स्त्रियांच्यासाठी जागृतीचे काम करते.परंतु पुढे तिचा अरब राष्ट्रातील एक वृद्धाशी निका लावला जातो.मुस्लीम कुटुंबातील स्त्रीच्या केविलवाण्या जगाची कैफियत या कादंबरीत आहे.समकालीन जीवनातील रझिया पटेल यांच्या सिनेमाबंदी चळवळीची पार्श्वभूमी या कादंबरीत आहे.सलोनीचे हे आत्मनिवेदन आहे.पत्रात्मक तंत्राचा वापर या कादंबरीत आहे.मुस्लीम जीवनाचा,संस्कृतीचा व भाषेचा चांगला वापर या कादंबरीत आहे.
 'दौलत' या कादंबरीत महाराष्ट्रातील दलित तरुण व मारिया या निग्रो तरुणीच्या प्रेमकहाणीचे चित्रण आहे.मात्र या प्रेमकहाणीस वर्णभेदाची व रंगभेदाची पार्श्वभूमी आहे.पत्रशैलीचा प्रभावे या कादंबरीवर आहे.माणूसपण नाकारणाच्या भारतातील जातवास्तवाची पार्श्वभूमी या चित्रणास आहे.मारिया ही समाजशास्त्राच्या संशोधनासाठी भारतात सहा महिन्यासाठी आलेली आहे.या काळात तिची दलित चळवळीतील अभ्यासू कार्यकर्ता दौलत कांबळेशी ओळख होते व ओळखीचे रूपांतर प्रेमात होते.दौलतच्या मनात अंतर्द्वद्व आहे.तिच्यासोबत जाण्याचा निर्णय काय घ्यावा याबद्दलचा.एका बाजूला वडिलांनी समाजासाठी काम करण्याचा दिलेला सल्ला,आपला अभावग्रस्त समाज आणि दुस-या बाजूला प्रेम याच्या काचात तो अडकलेला आहे.जातमुक्तसमाजाच्या तो प्रतिक्षेत आहे.पत्रसंवादात दोन देशातील सामाजिक विषमतेचे सूत्र ते ऐकमेकांना सांगतात.दौलत भारतातील गुंतागुंतीच्या तीव्र दुख-या जातवास्तवाची माहिती तिला देतो.मनातील या जाणिवेमुळे तो प्रेमाचा त्याग करतो आणि भारतातच बाबासाहेबांच्या तिस-या पिढीचा कार्यकर्ता म्हणून राहण्याचा तो निर्णय घेतो,‘छोड़ दे सारी दुनिया किसी की लिए। ये मुनासिब नही आदमी के लिए प्यार से भी जरुरी कई काम है। प्यार सबकुछ नही आदमी के लिए। हे गाणं तो ऐकतो आणि त्यांच्या मनातील द्वंद्वाला नवी दिशा मिळते. समाजबदलासाठी आणि जातमुक्तीसाठी तो इथेच राहण्याचा निर्णय घेतो.
 देशमुख यांना प्रेमापेक्षा देश व समाजकार्य महत्त्वाचे वाटते,या विचारसूत्राचा आविष्कार करणारी ही कादंबरी आहे.ती एकरेषीय स्वरूपाची आहे.दोन व्यक्तींच्या परस्परसंबंधातून ती उलगडते.जातीय वास्तवाचे तीव्र स्वरूपाचे ताण तीमध्ये नाहीत.पृष्ठस्तरावरच ते राहातात.वाचकाचे लक्ष दौलत आणि मारिया यांच्या प्रेमकथेकडेच वेधून राहातात.कादंबरीत पत्रतंत्राचा व हिंदी गाण्यांचा प्रभावी असा उपयोग केला आहे.

 ‘हरवलेले दिवस' (२०१४) ही देशमुख यांची वेगळ्या विषयावरची कादंबरी.

लक्षदीप । १३