पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यामुळे स्त्री पुरुष होत नाही. सेक्समध्ये स्त्रीने आक्रमक असू नये असा काही नियम नाही निसर्गाचा.”
 “म्हणजे... म्हणजे...'
 तू स्त्रीच आहेस बेटा. आणि मी ते कोर्टात सिद्ध करणार आहे.” मंजुळा ठामपणे म्हणाली, “बस्, तू स्वत:ला सांभाळ. दोनदा मरता मरता वाचलीस. पुन्हा असा जीव पणाला लावायचा नाही. पुन्हा नाही संधी मिळणार जगण्याची. इतका स्वत:वर अन्याय करू नकोस."
 "प्रॉमिस भाभी. आता मी जगेन.” मीना तिचा हात हाती घेत आपल्या डोळ्यांना लावीत सद्गदित स्वरात म्हणाली.
 " ‘त्या गाण्याप्रमाणे, एकाच या जन्मी जणू, फिरुनी नवी जन्मेन मी.' माझं झालं आहे. याचि देही याचि डोळा या एकाच जन्मात एका महिन्याच्या अंतरात मी ‘फिरुनी नवी जन्मास आले आहे. तुम्ही, आता माझ्या भाभी, या जीवनी आई का होत नाहीत?"
 "का नाही बेटा?" मंजुळा तिला जवळ घेत म्हणाली “माझी मीना बेटी आहेस. पुन्हा कधी स्वत:ला 'मर्दसिंग' समजायचं नाही. कोणी तसं म्हटलं तरी मनास लावून घ्यायचं नाही."
 मीना प्रसन्नपणे हसून म्हणाली, “हां भाभी, अहं, आई, आज मला प्रथमच १०० टक्के स्त्री असल्याचं मनापासून वाटतंय. सारे संभ्रम संपले आहेत. तू मला पुनर्जन्म दिला आहेस. एका नव्या मुलीला.”
 मंजुळा तिचे आनंदाश्रूनी भरलेले डोळे पदरानं पुसत ममतेनं म्हणाली,

 "माझी गुणाची पोर."

११० । लक्षदीप