पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

८. बंद लिफ्ट


 "तुला असं वाटतं नाही हॅम की, या दोन्ही विल्यम भगिनी म्हणजे प्युअर ब्लॅक डायमंड आहेत?”
 निलूनं जिनचा सिप घेत टी. व्ही.च्या पडद्यावर व्हीनस व सेरेना य अमेरिकेच्या कृष्णवर्णीय भगिनींमधला यू. एस. ओपनचा अंतिम सामन्याचा श्वास रोखायला लावणारा थरारक पहिला सेट पाहताना उत्स्फूर्तपणे म्हटलं!
 हॅमनं तिचे हे उद्गार ऐकले न ऐकले असे करीत काहीच उत्तर दिलं नाही. निलूनं विल्यम भगिनींना ब्लॅक डायमंड हे लावलेलं विशेषण जुन्या स्मृती जागं करीत त्याला डंख मारीत होतं म्हणून तिला पाठमोरा होत, बंद खिडकीच्या काचेतून तो मुंबईचा प्रसिद्ध असणारा बेबंद पाऊस अनिर्बधपणे कोसळताना पाहात होता. त्याच्या जुहू बीचवर असलेल्या सागर दर्शन अपार्टमेटच्या टेरेस फ्लॅटच्या बंद काचेतून निसर्गाचा तो प्रताप पाहताना भरतीची वेळ असल्यामुळे उचंबळून आलेल्या सागराप्रमाणे तोही मनोमन स्वैर विचारांनी उसळत होता, धुमसत होता! पूर्ण वातानुकूलित बेडरूममध्ये शरीर गारेगार करणारा गारवा निलूच्या लोभस, उबदार संगतीत शरीर रोमांचित करीत होता. पण तिच्या त्या उद्गारांनी त्याची ती नशा क्षणार्धात ओसरली व तो तिच्यापासून अलग होत खिडकीला लगटून बाहेर पाहू लागला होता!
 तो निसर्गाचा प्रताप पाहताना हॅमला बालपणीच्या झोपडपट्टीच्या दिवसांतले धुवाधार पावसाच्या रूपानं नित्य अनुभवास येणारे चिखल, घाणीचे, कुडकुडणा-या थंडीचे, ओल्या व न वाळल्यामुळे कुबट वास मारणाच्या कपड्यांचे, रोजगार बुडाल्यामुळे पोटाला पडणाच्या फाक्याचे व पोटाप्रमाणे मन मारूनही कुरतडणाच्या भूकेचे क्षण जागे होत होते! पायामधील चपलेचा खिळा चालताना अंगठ्याला टोचावा, तसे हॅमचे अंतरंग मंदपणे ठणकत होते.

 निल जशी क्रिकेटची चाहती होती, तशीच टेनिसचीही. त्यामुळे चारही अॅण्डस्लॅमच्या स्पर्धा ती सहसा चुकवत नसे. आपल्या एअर होस्टेसच्या कामाचं शेड्यूल दर तीन महिन्यांची ड्यूटी बदलताना ग्रॅण्डस्लॅमच्या वेळापत्रकाला नजरेसमोर ठेवून कौशल्यानं

लक्षदीप । १११