पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तनू तिच्या जीवनात आली आणि त्यांची दाट मैत्री झाली. दोघी स्पर्धेच्या वेळी एकत्र राहू लागल्या. रूम पार्टनर म्हणून. अशाच एका स्पर्धेच्या वेळी हॉटेल रूममध्ये धुंद क्षणी तनूनं पुढाकार घेतला आणि मीनाचं शरीर साथ देऊ लागलं. आणि दोघींनी लेस्बियन कपल म्हणून एकत्र राहायचं ठरवलं. तनू म्हणायची, “तुझा आक्रमकपणा मला सुखावतो.” मीना प्रत्युत्तर द्यायची. “मलाही तुझा कोवळेपणा आवडतो." तिनं त्या संबंधात आपला आक्रमक पुरुषीपणा अभिमानानं मान्य केला होता.
 “भाभी, कसं सांगू?" मला तनू भेटली अन् एक प्रखर सत्य जाणवलं की, खरंच का मी मीना नाही, मर्दसिंग आहे. आम्ही काही काळ एकत्र 'लेस्बियन कपल” म्हणून राहिलो होतो, तनूनं मला जाणीव दिली की मी पुरुषी आहे. मर्दसिंग आणि.. आणि..' मीनाला हुंदका फुटला होता.
 मंजुळाला तिची चीड कमी व दया जास्त येत होती. तिच्या केसचा अभ्यास करताना सी. ए. आय. एस. स्त्रियांच्या लैंगिक जीवनाचीही माहिती मंजुळानं करून घेतली होती. अशा स्त्रिया 'बायोसेक्स्युअल' असू शकतात. त्या पुरुषांच्या संगतीत स्त्री म्हणून लैंगिक सुख जसे उपभोगू शकतात, तसेच त्यांच्यात लेस्बियन प्रवृत्ती पण असू शकते. मीना तशीच होती.
 “भाभी, पुन्हा किशोर माझ्या जीवनात आला. त्यात त्यानं आजही माझ्यावर पूर्वीइतकंच प्रेम असल्याची ग्वाही दिली आणि मी तनूपासून अलग झाले. पुन्हा कधी असे संबंध ठेवले नाहीत, बिलीव्ह मी. कारण मला माझ्या किशोरसाठी अस्सल जातिवंत स्त्री म्हणूनच राहायचं होतं. माझ्या त्या मर्दानगीला पूर्णपणे संपवायचं होतं. म्हणून तिला दूर सारलं, पण परवा ती वाट वाकडी करून आली. ती बोलली नाही. पण तिला नक्कीच सानियानं पाठवलं असणार मला पूर्णपणे खच्ची करण्यासाठी."
 “हे तुला कळत होतं की, सानिया आपली व्हिलनगिरी उघडकीस येऊ नये म्हणून अशी खेळ खेळत होती. तरीही-"
 “त्याक्षणी तनूला समोर पाहून व तिच्या सतत संबंधाच्या बोलण्यामुळे माझ्या मनात पुन्हा तोच सल सलू लागला - खरंच का मी पुरुष आहे? दोह्याच्या मेडिकलचा रिपोर्ट कुठंतरी मनोमन आत खोलवर घट्ट घर करून होताच आणि तनूशी माझा असलेला संबंध खराच होता. आणि त्यावेळी मी आक्रमक असायची. त्यामुळे पुन्हा मी..."

 “पोरी, कसलं नशीब घेऊन आली गं.” तिच्या डोईवरून ममतेनं हात फिरवत कळवळून मंजुळा म्हणाली, “अगं, तुझ्या गरीब जीवनातील अपु-या आहारानंही फरक पडतो. त्यामुळे छाती व नितंब सपाट राहतात, पण तरीही तुझ्यासारख्या सी. ए. आय. एस. स्त्रिया या स्त्रीचं परिपूर्ण जीवन जगत असल्याची कितीतरी उदाहरणं मला इंटरनेटवर मिळाली आहेत. बायसेक्स्युअल असणं नैसर्गिक आहे. म्हणून काय

लक्षदीप । १०९